सातारा : धावपटू ललिता बाबर हिने रिओ ऑलिम्पिकमध्ये 300 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळवून ऐतिहासिक कामगिरी करत भारताचा व सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला. तिचा जिल्हा बँकेच्यावतीने 5 लाखाचा धनादेश देवून सत्कार केला. भविष्यात टोकिओ येथे 2020 मध्ये होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी दरवर्षी आर्थिक मदत देणार आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सभा आज आयोजित केली होती. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्हा. चेअरमन सुनिल माने, विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, मुख्य कर्मचारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, लक्ष्मणराव पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. प्रभाकर घार्गे, बाळासाहेब पाटील, आ. जयकुमार गोरे, विक्रमसिंह पाटणकर, दादाराजे खर्डेकर, अनिल देसाई, प्रकाश बडेकर, राजेश पाटील-वाठारकर, वसंतराव मानकुमरे, अर्जुनराव खाडे, प्रदीप विधो, सौ. सुरेखा पाटील, सौ. कांचन साळुंखे, सनदी लेखापाल गोगटे (चार्टर्ड अकौटंट), कर सल्लागार तानाजीराव जाधव, त्याचबरोबर बँकेचे सभासद संस्थांचे प्रतिनिधी, व्यक्तिगत सभासद तसेच अनेक मान्यवर, बँकेचे व्यवस्थापकीय अधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ललिता बाबर हिने रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहचून चांगली कामगिरी केली. तिने अॅथलेटिक्समध्ये ऐतिहासिक कामगिरी करुन भारताचे त्याबरोबर आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये जाणेसाठी तिला बँकेने यापूर्वीही मदत केलेली आहे. ललिता बाबरने आपल्या घरची काळजी न करता टोकिओ ऑलिम्पिक 2020 साठी जरुर ती तयार करावी व भारताला पदक मिळवून द्यावे बँकेमार्फत आपणास सर्व मदत केली जाईल असे सांगितले.
बँकेची सभा अत्यंत खेळीमाळीचे वातावरणात होत आहे. जिल्हा बँक ही देशातील सहकारी बँकिंगमधील एक नंबरची बँक आहे. बँकेच्या स्थापनेपासून बँकेला सतत ऑडीट वर्ग अ मिळत आहे. बँकेची स्थापना झाली त्यावेळी कायदे कडक नव्हते त्रिस्तरीय कर्ज वाटपाची पध्दत होती. आता कायदे कडक झालेले आहेत. सहकार कायद्यामध्ये झालेले बदल आपणास स्वीकारणे अनिवार्य आहे. जागतिकीकरण व खुली अर्थव्यवस्था यामुळे राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका ग्राहकांना आधुनिक बँकींग सुविधा उपलब्ध करुन देवू लागल्या. आपल्या बँकेच्या ग्राहकांनाही आधुनिक बॅकिंग सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी बॅकिंग कोअर बँकिंग प्रणाली सुरु करुन ग्राहकांना आरटीजीएस/एनईफटी, एसएमएस बँकिंग, एटीएम, एनी व्हेअर बँकिंग इ. सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. बँकेने सर्वसामान्य शेतकर्यांना नेहमीच मदत केलेली आहे. शेतकरी सभासद, संस्था यांचेसाठी बँकेने नफ्यातून सर्वसामान्य तरतूदी केलेल्या आहेत. बँकेत कोणत्याही प्रकारचे राजकारण आणले जात नाही. त्यामुळेच बँकेचा नावलौकिक संबंध देशभर झालेला आहे. बँकेने शैक्षणिक कर्ज, शेतकरी निवास, शेतकरी कॅश क्रेडिट, गृहकर्ज, अॅग्रो ट्युरिझम अशा अनेक योजना कार्यान्वित करुन त्यामार्फत कर्ज वाटप केले जात आहे. परंपरागत कारणासाठी कर्ज वितरण न करता नवनवीन योजनांसाठी कर्ज वितरण केले पाहिजे. 97 व्या घटना दुरुस्तीमध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत त्याचाही विचार केला पाहिजे. बँकेमध्ये ठेवीदारांचे पैसे आहेत, त्यामुळे त्यांची विश्वासार्हता जपली पाहिजे.
ललिता बाबर हिने बँकेने मला या ठिकाणी बोलावून माझा सत्कार केलेबद्दल मला आनंद होत असलेचे सांगितले. रिओ ऑलिम्पिकमधून परतलेनंतर या ठिकाणी आलेनंतर सर्वांनी माझे कौतुक व अभिनंदन केलेमुळे माझा उत्साह वाढलेला असून मला प्रोत्साहन मिळालेले आहे त्यामुळे मी टोकिओ ऑलिम्पिक 2020 मध्ये पदक मिळेल याची खात्री असलेचे नमूद केले आहे. बँकेने मला आर्थिक मदत केलेबद्दल मी बँकेची ऋणी असलेचे सांगितले.