सातारा : सातार्यातील वाईमधल्या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 2700 जणांचे पंचनामे केल्याची माहिती पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली आहे. आरोपी संतोष पोळने सात खून केल्याची कबुली दिली होती.
वाईतील कसाई संतोष पोळने केलेल्या सात हत्यांमुळे अवघ्या राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस अतिशय बारकाईने आणि योग्य दिशेने तपास करत आहेत. या सर्व हत्यांमागे पैसे किंवा सोन्याचा हव्यास ही कारणं असावीस असा अंदाजही नांगरे-पाटील यांनी व्यक्त केला आहे.
कसा सापडला संतोष पोळ?
13 वर्षात 7 खून पडले, तरीही डॉ. संतोष पोळ मोकाट होता. मात्र डॉ. पोळचे दिवस भरले तेच अंगणवाडी सेविका संघटनेच्या राज्याध्यक्ष मंगल जेधे गायब झाल्या त्या दिवशी. 16 जून 2016 ला मंगल जेधे घरी परतल्या नाहीत, त्यामुळे कुटुंबानं पोलिसात तक्रार दिली आणि हाती लागला सर्वात मोठा पुरावा. अर्थात संतोष पोळची मैत्रीण आणि साथीदार ज्योती मांढरे.