(धनंजय क्षीरसागर)
वडूज : गोरेगांव वांगी (ता. खटाव) येथील सुपुत्र व कराड उत्तर काँग्रेसचे युवा नेते धैर्यशिल कदम यांनी नुकतीच त्यांच्या नेतृत्वाखाली औंध घाटमाथ्यावर उभ्या राहत असलेल्या वर्धन अॅग्रो प्रोसेसिंग लि. या साखर कारखाना कार्यस्थळाची संचालक, प्रमुख कार्यकर्ते तसेच तिन्ही तालुक्यातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमवेत पाहणी केली. या निमित्ताने त्यांनी कराड उत्तरमधील प्रस्थापित नेतृत्वाला शह देण्याच्या उद्देशाने पुढच पाऊल टाकल्याची चर्चा राजकीय जाणकारांमध्ये आहे.
कराड उत्तर म्हंटले की, स्व. पी. डी. पाटील यांचे घराणे असे आजवरचे समीकरण आहे. या घराण्याच्या विरोधात आत्तापर्यंत माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांचे भाचे कै. बाबुराव कोतवाल, कै. बाबासाहेब चोरे (पाटील), आ. आनंदराव पाटील (नाना), कराड जनशक्तीचे अरुणराव जाधव आदिंनी टक्कर दिली. मात्र कै. शामराव आष्टेकरांचा अपवाद वगळता कोणाची डाळ शिजली नाही. आनंदराव नाना व जाधवांनी आपापल्या सोयीप्रमाणे बदलत्या राजकारणात पी.डी. च्या गटाशी सोयरीकही केल्याचे जाणवते. अशा परस्थितीत वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीत नवख्या धैर्यशिल कदमांना आ. बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात लढण्याची वेळ आली. बलाढ्य कृष्णाकाठ, महायुतीचे वारे विरुध्द येरळा खोर्यातील सर्वसामान्य कुटुंबातील माजी पंचायत समिती सदस्य असणारे धैर्यशिल कदम ही लढाई कशी होणार ? याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले गेले. त्यातच एकूण मतदारसंघाच्या तुलनेत केवळ छटाकभर असणारा खटाव तालुक्यातील पुसेसावळी हा एकच गट कराड उत्तर मतदारसंघात समाविष्ट आहे. त्या गटातीलही एकेकाळी विधानसभा निवडणूक लढविलेले जितेंद्रदादा पवार, माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, मानसिंगराव माळवे, भाग्यश्री भाग्यवंत ही हेवीवेट मंडळी बाळासाहेबांच्या ताफ्यात होती. अशा परस्थितीत चिवटपणे झुंज देत धैर्यशिल दादांनी सुमारे 55 ते 60 हजार अशी दुसर्या क्रमांकाची मते घेतली. तर महायुतीचे वारे असतानासुध्दा स्वाभिमानीच्या मनोजदादा घोरपडेंना तिसर्या क्रमांकावर जावे लागले होते.
आजपर्यंत केवळ निवडणूकीपुरता आ. बाळासाहेब पाटील यांच्या विरोधातील गट सक्रीय असायचा मात्र निवडणूक झाल्यानंतर ही 40 ते 45 टक्के मते बिनचेहर्याची होत होती. या मतांना आकार देण्याचे नियोजन कदम यांनी अस्ते अस्थे सुरु केले आहे. पी. डी. च्या विरोधात काम करताना साखर कारखान्याची मोठी अडचण जाणवते. ती सोडविण्याच्या दृष्टीने कदमांनी पाऊल उचलले आहे. त्यादृष्टीने त्यांनी खटाव, कोरेगांव व कराड या तीनही तालुक्यांना मध्यवर्ती असणार्या औंध घाटमाथ्यावरील जागेची निवड केली आहे. संचालक मंडळातही त्यांनी कोपर्डेचे हिंदुराव चव्हाण, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष संपतराव माने, माजी जिल्हा परिषद सदस्य भिमराव पाटील, सुदामराव दिक्षीत, माजी पंचायत समिती सदस्य भिमराव डांगे, दिपक लिमकर, सुनिल पाटील, विकास जाधव, दत्तात्रय साळुंखे आदी बिनीचे शिलेदार घेतले आहेत. कोणत्याही परस्थितीत येत्या जानेवारीला हा महत्वकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्याचा कदम व सहकार्यांनी निर्धार केला आहे. धैर्यशिलदादा कदम हे मुळचे व्यावसायिक असल्या कारणाने हा कारखान्याचा प्रकल्प ते निश्चितपणे मार्गी लावू शकतात. व त्याचा नैसर्गिक फायदा आगामी काळात होणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकत्यांना होवू शकतो.