सातारा : हवामान खात्या पुढील 48 तासांच्या कालावधीमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. धरणांमध्ये 75 ते 80 टक्के पाणी साठा झाला असून येणारी आवक पाहता कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग सुरु करावा लागेल. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी नदी, ओढे इत्यादीपासून दूर राहून सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले आहे.
सद्यस्थितीमध्ये सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. आज अखेर सातारा जिल्ह्यामध्ये सरासरीच्या 106 टक्के पाऊस झालेला आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणे ही साधारणत: 75 ते 80 टक्क्यांपर्यंत भरलेली आहेत. तसेच सदर धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. त्याचप्रमाणे हवामान खात्याने पुढील 48 तासांच्या कालावधीमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. या सर्व बाबींचा विचार करता जिल्ह्यामध्ये असणार्या धरणांमध्ये कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग सुरु करावा लागणार आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी नदी, ओढे इत्यादीपासून दूर राहून सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणासाठी नदी पात्रामध्ये जाण्याचा प्रयत्न करु नये. कारण अचानक पाणी पातळी वाढून जिवीतास धोका उद्भवू शकतो.
नदीवरील अथवा ओढ्यावरील पुलावरुन पाणी वाहत असताना पूल ओलंडण्याचे धाडस करु नये. जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये आश्रय घेवू नये. अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये घाटामध्ये दरड कोसळण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे डोंगराळ भागातील घाट रस्त्याने प्रवास करण्याचे शक्यतो टाळावे, असे आवाहनही श्री. मुद्गल यांनी केले आहे.