सातारा ः त्रिपुरारी पौर्णिमा (कार्तिक पौर्णिमा) कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री शंकराने त्रिपुरासुराचा नाश केला, त्या प्रित्यर्थ हा उत्सव साजरा केला जातो. हा देवांचा उत्सव असून असुरी शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय म्हणून तो भारतातील बर्याच ठिकाणी मंदिरांतून साजरा केला जातो. त्रिपुरारि पौर्णिमा हा उत्सव कार्तिक पौर्णिमा या तिथीला साजरा केला जातो. त्रिपुर या दैत्याने ब्रह्मदेवाची आराधना करून त्यास संतुष्ट करून घेतले. इतर देवांनी त्याच्या आराधनेत विघ्न आणण्यासाठी पुष्कळ खटपट केली; परंतु ती व्यर्थ गेली. ब्रह्मदेव वर देण्यास सिद्ध झाला. त्रिपुराने मला अमरत्व प्राप्त व्हावे, असा वर मागितला. वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवांस सतावून सोडले. प्रत्यक्ष श्रीविष्णूसही त्या त्रिपुराचा प्रतिकार करता आला नाही. शेवटी शंकराने तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्या दैत्याचा वध करून देवांचे गेलेले वैभव त्यांना परत मिळवून दिले. आपले गेलेले वैभव परत मिळालेले पाहून सर्व देवांस आनंदी आनंद झाला आणि त्यांनी शंकराची स्तुती करून दीपोत्सव केला. तेव्हापासून प्रत्येक वर्षी कार्तिक शुद्ध पौर्णिमेस हा उत्सव साजरा केला जातो.
सातारा येथील यादोगोपाळ पेठेतील मुरलीधर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिपोत्सव साजरा करण्यात आला.
तेजाचे अधिष्ठान असलेला हा दिवस दिपोत्सवाच्या रूपात साजरा केला जातो. अनेक मंदिरात पारंपरिक पद्धतीने तेलाचे दिवे लावले जातात व संपूर्ण मंदिर परिसरात दिवे लावले जातात.
( छाया : अतुल देशपांडे)