सातारा : वाईचा कुख्यात क्रूरकर्मा डॉ. संतोष पोळ याच्याकडून झालेल्या 6 हत्यांच्या प्रकरणात कोर्टात खटला चालवणेकामी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे या खटल्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.
संपूर्ण राज्यात गाजलेले वाई शहरातील 7 खूनांचे प्रकरण चर्चेच्या दृष्टीकोनातून शमले असले तरी कायदेशीर दृष्ट्या सुरु असलेल्या प्रक्रियेने मात्र वेग घेतला आहे. या गुन्ह्यातील प्रमुख व मुख्य आरोपी संतोष गुलाबराव पोळ व ज्योती पांडुरंग मांढरे हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचे गांभीर्य तसेच आरोपींची खून करण्याची क्रूरता याचा विचार करुन आरोपीस जास्त कठोर शिक्षा व्हावी व सरकारची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी निष्णात वकील अॅड. उज्वल निकम यांची खास नियुक्ती करण्यात यावी असा पत्रव्यवहार साताराचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी गृहमंत्रालयाशी केला होता. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील कोल्हापूर यांनी त्यास मंजूरी दिली होती. पोलीसांच्या या मागणीला गृह विभाग तसेच विधी व न्याय विभाग यांनी मंजूरी दिली असून 6 खूनांचा गुन्हा खटला चालवण्याकामी अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती निश्चित झाली आहे. या सर्व गुन्ह्यांचे कामकाज निकम पाहतील असे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.