सातारा : गेली दहा वर्षे सातत्याने एसबीएन चॅनेलच्या माध्यमातून संपूर्ण सातारा जिल्हयासाठी विविधांगी कार्यक्रम सादर केले. अनेक मान्यवरांच्या सहकार्याने हाती घेतलेले हे कार्य केवळ करमणूक नव्हे तर वैचारिक आदान प्रदान करणारे सर्वाचे आपले माध्यम म्हणून आजपर्यंत ही मजल गाठली. आज संपूर्ण मिडीयात उपद्रव मुल्यांवर आपली किंमत ठरत असताना हा सारा प्रकार बाजूला ठेवून पोषणमुल्य लक्षात घेवून काम करत माझी ही संस्था हा वर्धापनदिन साजरा करत आहे. प्रत्येकवेळी समाजाकडून घेण्यापेक्षा आपणही समाजाचे देणे लागतो या भूमिकेतून यापुढे सातार्यात दरवर्षी असा विविधांगी महोत्सव साकारत राहणार आहे असे उदगार ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक, नाटककार व एसबीएन चॅनेलचे प्रमुख तुषार भद्रे यांनी काढले.
एसबीएन चॅनेलच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त तुषार भद्रे स्कुल ऑफ थिएटर अँड फिल्म आर्ट च्या वतीने शाहू कालामंदिरात आर्ट फ्युझन ेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले होते. याचे समारोप प्रसंगी बोलताना भद्रे यांनी वरील उदगार काढले.
या कार्यक्रमात नाटककार सुधाकर गाढवे यांच्या जिवंत मुडदे या पुस्तकाचे प्रकाशन पत्रकार व रंगकर्मी राजू मुळये यांचे हस्ते करण्यात आले. तसेच याप्रसंगी पुणे येथील फिल्म फेस्टिव्हलमध्ये तब्बल 57 एंट्रीतून निवडल्या गेलेल्या सातारा येथील एका फिल्मचे संकलक संदीप जंगम, धोडींबा कारंडे,दीपक देशमुख आदींचा सत्कार करण्यात आला.
समारोप कार्यक्रमापूर्वी युवकांपुढील आव्हाने या घेण्यात आलेल्या परिसंवादामध्ये ज्येेष्ठ कायदेतज्ञ अॅड. धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाटयविभाग संघटनेचे सरचिटणीस प्रेम भोसले, भाजप युमोचे रणजित माने, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कविता म्हेत्रे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे मयुर खराडे, जे.एन.यु. विद्यापीठाचे किरण पवार, सामाजिक कार्यकर्ती रखमा श्रीकांत आदींची या परिसंवादात मनोगते व्यक्त झाली.
यावेळी बोलताना अॅड.डी.व्ही.पाटील म्हणाले की, तुषार भद्रे यांचे हे कार्य सर्वसामान्यांना आपलेसे वाटले. आज हिंदी, इंग्रजी चॅनेलमध्ये चाललेले अतिशय वाईट वर्तन पाहता लाज वाटते. अंगावर जावून फक्त मारामार्या करायच्याच यामधे राहतात. सत्ताधार्यांच्या बाजूने बोलणे हेच या सर्वाना माहित असते आणि त्यातही उपद्रव देणार्याचे बरे चालले आहे आणि चांगले विचार देणार्यांना दारूण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. मात्र या सर्वातही भद्रे यांनी गेली 11 वर्षे हे कार्य वसा म्हणून सांभाळले आणि जोपासले. त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देतो.
यावेळी हेमा सोनी, श्रीकांत के टी, मधू फल्ले ,शशी गाडे , सागर गायकवाड,राजन कुंभार,अमित देशमुख दीपक देशमुख,राजू मुळ्ये , अतुल कुलकर्णी, सौ. सुनेत्रा भद्रे आदी मान्यवर रंगकर्मी,चित्रकार उपस्थित होते.
सलग पाच दिवस झालेल्या या महोत्सवात लोकरंगमंच, सातारा निर्मित तुषार भद्रे लिखित व रोहित ढेबे दिग्दर्शित लादेनच्या शोधात या नाटकाचा प्रयोग,पल्याड ग्रुप, सातारा निर्मित निमंत्रितांचे काव्य संमेलन, संध्या रंगारी यांच्या कवितांचा नाट्याविष्कार संध्यारंग अर्थात कविता बाईच्या तसेच इरफान मुजावर लिखित नंगी आवाजे व ब्लॅक अॅण्ड व्हाईट या कैलास भापकर व अजिम पटेल दिग्दर्शित 2 एकांकिका सादर करण्यात आल्या.
त्यांनतर कोल्हापूरचे शिल्पकार सत्यजीत निगवेकर, अमित भिवदरर्णे आणि सातारचे संजय कुंभार शिल्पकलेची प्रात्यक्षिके, ए. बी. थिएटर कोल्हापूर निर्मित विल्यम शेक्सपियर यांची जागतिक अजोड कलाकृती 2 अंकी नाटक हॅम्लेट, चित्रकार प्रा. सत्यजीत वरेकर-सांगली, जयकुमार वाला-पुणे आणि सागर गायकवाड-सातारा हे प्रोट्रेट, लॅण्डस्केप व क्रिएटिव्ह लॅण्डस्केप या चित्रकलेचे प्रात्यक्षिके, रंगभूषाकार कुमार भुरके, शशी आवळे व प्रशांत इंगवले हे रंगभूषा-वेशभूषा यांची प्रात्यक्षिके, गायन समाज देवल क्लब निर्मित विद्यासागर अध्यापक लिखित-दिग्दर्शित ब्लॅक कॉमेडी नाटक दर्द-ए-डिस्को सादर होवून या महोत्सवाची सांगता लोकरंगमंच सातारा निर्मित राजीव मुळ्ये लिखित दिग्दर्शित आणि झी अॅवॉर्ड व राज्यनाट्यस्पर्धा पारितोषिक विजेते नाटक बैल अ-बोलबाला च्या प्रयोगाने झाली. या संपूर्ण महोत्सवाचे आयोजनात सागर गायकवाड, बाळकृष्ण शिंदे, प्रतिक भद्रे, दिपक खांडके, प्राचार्य विजय धुमाळ, राजीव मुळ्ये, राजन कुंभार आदींनी परिश्रम घेतले.
(छाया : अतुल देशपांडे)