
सातारा : तब्बल दोन महिन्याची सुट्टी संपवून सुट्टीतील गोड आठवणी उराशी बाळगून आज काहींनी उत्साहाने तर काहींनी जड अंत:करणाने शाळेची वाट धरली. आज 15 जूनला नवी शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली आणि मुलांच्या किलबिलाटासह शाळेतून येणारे घंटेचे सूर, पाठीवरील नवीकोरी दप्तरे, अंगात घातलेला नवीन गणवेश आणि याच उत्साहात भर पडली ती इयत्ता आठवी पर्यंतच्या मुला मुलींना शाळेतून मिळालेली नवीन पुस्तके यामुळे.
गेल्या काही दिवसांपासून शालेय आवाराची स्वच्छता करुन नवीन शैक्षणिक वर्षाला आज सुरुवात झाली. यानिमित्त शाळांपुढे स्वागत कमानीही घालण्यात आल्या होत्या. तसेच मुलांचा आनंद वाढवणारी बालगीते, सुबक रांगोळ्या व विविध रंगी फुला पानांनी शाळांना सुशोभीत करण्यात आले होते. सातारा शहरातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेच्या बालक मंदिराची नव्याने बांधलेली भव्य इमारत आज संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन होत मुलांसाठी सुरु झाली. न्यू इंग्लीश स्कूलच्या प्रागणात उभारलेल्या या नुतन इमारतीत छोटा गट, मोठा गट हे शिशू वर्ग सुरु करण्यात आले. नवागतांच्या स्वागतासाठी शाळेच्या आवारात देवी सरस्वती, भारत माता, बालगणेश, मिठू मिठू बोलणारा पोपट, कार्टून मधील मिकी डोनाल्ड आणि गमती जमती करणारा विदूषक अशी पात्रे प्रवेश व्दारात उभारुन नव्या बालचमूंचे स्वागत करत होती.
सातारा शहरातील नगर परिषद शिक्षण मंडळाच्या वतीने चालवण्यात येणार्या पालिकेच्या विविध शाळामध्ये मुलांचे स्वागत शिक्षकांनी गुलाब पुष्प देवून तसेच शालेय वह्यांचे वितरण करुन केले. सातारा शहरातील दातार शेंदूरे इंग्लीश मिडीयम स्कूलने विद्यार्थ्यांच्या मध्ये जिज्ञासा व कल्पकता वृध्दींगत करण्यासाठी अनोखा उपक्रम आयोजित करुन शाळेच्या प्रवेशव्दारात आकर्षक स्वागत कमान उभारली होती.
बालक मंदिरातील शाळेचा पहिला दिवस असल्याने अनेकांना मोठे कुतुहल वाटत होते. तर अनेकांनी ….नको शाळा…चला घरी म्हणत आपल्या आई वडिलांच्या कडेवरच भोकाड पसरले होते. यावर्षी माध्यमिक शाळांच्या इयत्तांपैकी सातवी व नववीची पाठ्यपुस्तके अभ्यासक्रम बदलल्यामुळे अद्यापही बाजारात उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे या शालेय विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची उत्सुकता ताणली गेली असून बाजारात केवळ इतिहास व भूगोल या विषयांचीच पाठ्यपुस्तके उपलब्ध झालेली आहेत.