सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती प्रकीया ही चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याची गंभीर बाब निकालानंतर समोर आली आहे. नोकर भरतीप्रकरणी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे तक्रार केली असून मंत्री देशमुख यांनी सहकार आयुक्तांना तात्काळ पुढील कारवाईचे आदेश दिले असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी पत्रकार परीषदेत माहिती देताना सांगितले. दरम्यान बोगस भरती प्रकरणी लवकरच कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अनिल देसाई माहिती देताना पुढे म्हणाले, नोकर भरती करण्यासाठी सातारा जिल्हा बँकेने पुणे येथील नायबर कंपनीला ठेका दिला होता. कंपनीच्या वतीने परीक्षा घेण्यात आल्या. परीक्षा झाल्याानंतर कंपनीने 6 जुन 2017 रोजी वेबसाईटवर उर्तीण झालेल्या मुलांचे बैठक क्रमांक दर्शविले होते. नायबर कंपनीने 13 जुन 2017 रोजी वेबसाईटवर अंतिम यादी जाहिर केली आहे. यामध्ये लिपीक या पदासाठी बैठक क्रं. 81262, 84960, 83668, 84359, 85996, 86090, 86774, 86836, 86862, 86933, 88058 हे सर्व लिपीक पदाचे नंबर असून हे सर्व नंबर दि. 6 जुन रोजी जाहिर झालेल्या यादीमध्ये नसतानाही अंतीम 13 रोजीच्या यादीत पास म्हणून दर्शविण्यात आले आहेत. तसेच शिपाई पदाचे बैठक क्रं. 1891, 2325, 2784, 4068, 6577, 9196 हे नंबरही गैरव्यवहार करून उर्तीण करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप देसाई यांनी केला आहे.
जिल्हा बँकेची भरती प्रकी्रया ही पारदर्शी नाही, निकालाचे गुण अद्यापर्यंत दर्शविण्यात आलेले नाहीत. फक्त वेबसाईटवर उर्तीण केलेल्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक दर्शविण्यात आलेले असून हे पूर्णपणे भरती मॅनेज प्रक्रियेनुसार करण्यात आल्याचा आरोप करून देसाई म्हणाले, नायबर कंपनीने भरती प्रक्रीया चुकीच्या पध्दतीने राबविली आहे. या भरती प्रक्रीयेला स्थगीत देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेवून मागणी केली आहे. सहकारमंत्र्यांनी सहकार आयुक्ताना पुढील कारवाईचे आदेश दिल्याचे देसाई यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.