सातारा : पर्यावरणाचा र्हास आणि निसर्गाचा असमतोल यामुळे मानवाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जागतीक तापमान वाढ, पर्जन्यमानात घट, गारपीट, अतीवृष्टी, भीषण दुष्काळ आदी गंभीर संकटे निसर्गाचा समतोल बिघडत चालल्याचीच उदाहरणे आहेत. निसर्गाचे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी केवळ वृक्षारोपण करुण थांबणे योग्य नाही तर, वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या झाडांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
निसर्गरक्षण आणि पर्यावरण रक्षणासाठी कर्तव्य सोशल ग्रुपने नेहमीच पुढाकार घेतला आहे. निसर्ग रक्षणासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्यावतीने आम्ही झाडे लावून देणार, तुम्ही संगोपणाची जबाबदारी पार पाडा, असा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ज्यांना रोपे पाहिजेत त्यांना मोफत रोपे देवून ग्रुपतर्फेच वृक्षारोपणही करुन दिले जात आहे. या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ सदरबझार येथील मुस्लीम समाजाचे कब्रस्थान आणि संजय मेहता यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करुन करण्यात आला. याप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी शरद गायकवाड, संजय मेहता, महेश देशमुख, गणेश भोसले, राजेंद्र रजपूत, बबलू जमादार, अलिम कुरेशी, सादिक कुरेशी, अनिल कांबळे, बाबू तळेकर, शंकर काकडे, राजू गायकवाड, आदित्य सोनवणे, अमोल कांबळे, सुरेखा भुतकर, वैशाली मेहता, वैशाली शिंदे, पुष्पलता पवार, सुनिल भुतकर, विजय देशमुख, सौ. कुंभार आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून कर्तव्य ग्रुपच्या माध्यमातून पर्यावरण आणि निसर्ग रक्षणासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. यावेळी केवळ वृक्षारोपण करुन न थांबता वृक्षसंवर्धन आणि लावलेल्या झाडांचे संगोपन व्हावे. वृक्षारोपणाचा उद्देश सफल व्हावा, यासाठी कर्तव्य ग्रुपने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. आम्ही मोफत रोपे देणार आणि ती रोपे आम्ही स्वखर्चाने लावून देणार. नागरिकांनी फक्त लावलेल्या झाडांची काळजी घ्यावी, त्यांचे संगोपन केले पाहिजे. त्याच उद्देशाने सदरबझार येथील मिलींद कॉलनीतील कब्रस्थान ट्रस्टच्या सदस्यांनी कर्तव्यकडे वृक्षारोपणाची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार कब्रस्थानमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पर्यावरणप्रेमी आणि वृक्षमित्र संजय मेहता यांच्या मागणीनुसार त्यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत ग्रुपमार्फत वृक्षारोपण करण्यात आले.
संजय मेहता यांचे वृक्षप्रेम त्यांच्या कार्यावरुन दिसत आहे. त्यांचा आदर्श सर्व नागरिकांनी घेतल्यास पर्यावरण रक्षणाचा उद्देश सफल होईल. मेहता आणि कब्रस्थान ट्रस्टने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेतली आहे. ते निश्चित लावलेल्या झाडांचे संगोपन करतील, असा विश्वास सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी व्यक्त केला. निसर्ग रक्षणासाठी सर्वांनीच आपली एक सामाजिक जबाबदारी म्हणून सकारात्मक पाऊल उचलले पाहिजे. जून महिन्यापासून कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून निसर्ग रक्षणासाठी वृक्षारोपण मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत एकट्याने किंवा ग्रपुने, विविध सामाजिक संस्था, महिला मंडळे, बचत गट, शाळा- महाविद्यालये यांच्यासह ज्यांना, ज्यांना आवड आणि वेळ आहे, त्या सर्वांनीच सहभागी व्हावे. कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून समाजमंदीर, खुल्या जागेत, सार्वजनीक ठिकाणी मोफत वृक्षारोपण करुन देण्यात येत आहे. झाडे लावल्यानंतर त्यांच्या संगोपनाची जबाबदारी मोहिमेत सहभागी होणार्यांनी पार पाडणे आवश्यक आहे. वृक्षारोपणानंतर जे लोक झाडांची काळजी घेतील, संगोपण करुन वृक्षवाढीसाठी सकारात्मक प्रयत्न करतील अशा लोकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी केले. निसर्ग रक्षणासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या वतीने आयोजित मोहिमेत सहभागी होण्यासाठी अमर मोकाशी (7350010303), महेंद्र जाधव (9860241111) यांच्याशी संपर्क साधावा.