सातारा : उंब्रज येथील दरोडा व खूनप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील 4 जणांना अटक करण्यात आली. उंब्रज येथे (मंगळवारी दि. 21) सशस्त्र दरोडा टाकून वृध्द महिला जैबून मुल्ला यांचा खून करण्यात आला होता. खून करणार्या टोळीचा छडा लावण्यात सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व उंब्रज पोलिसांना यश आले आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, संशयितांनी यापूर्वीही अशाच पध्दतीचे गुन्हे केले असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरोडेखोरांनी उंब्रजसह परिसरात दि. 21 नोव्हेंबर 2017 रोजी गोंधळ घातला होता. 50 तोळे सोन्यांचा ऐवजाची चोरी करताना जैबून मुल्ला यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता. दरोडेखोरांनी निर्घृणपणे त्यांच्या तोंडावर उशी ठेवून खून केला होता. या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत दरोडेखोरांनी वेगवेगळ्या पाच ठिकाणी दरोडा टाकून सुमारे 40 तोळे सोने लंपास केले होते. उंब्रज-मसूर रोडवरील एका हॉटेलवरही चोरट्यांनी दरोडा टाकून 6 हजाराची रोकड लांबविली होती. या घटनेचा सातारा पोलिसांनी कसून तपास सुरु केला. त्यामध्ये श्रीगोंदापर्यंत लिंक असल्याचे समोर आले. त्यानुसार संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
यामधील मिळालेले सीसीटीव्ही फुटेज चोरट्यांचे फिंगर प्रिंटस् यावरुन दरोड्याचा तपास सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पथक व उंब्रज पोलीस यांच्या मिळालेल्या सहकार्यामुळे दरोड्याचा तपास करण्यात यश मिळाले आहे. घटनास्थळाला पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी भेट देवून तातडीने चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. मुस्लिम समाजातील एका महिलेच्या तोंडावर उशी ठेवून खून केला होता. त्याप्रमाणे या दरोड्यात अटक करण्यात आलेल्या सर्व संशयिताविरोधात भादवि कलम 302 प्रमाणे व जबरी चोरी प्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दरोड्यातील ऐवज जप्त करण्याचे काम तपासातील पोलीस कर्मचारी, अधिकारी यांच्या मार्फत ज्यांचा ऐवज दरोड्यात गेला आहे त्यांना परत करण्यासंदर्भात न्यायालयाच्या परवानगीने पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे अशी माहितीही पत्रकार परिषदेत पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी दिली.
पत्रकार परिषदेला सातारा गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
. (छायाचित्र… संजय कारंडे )