साताराः अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा येथील गुरुकूल स्कूलचा विद्यार्थी आयुष अमर मोकाशी याने 48 ते 50 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. त्याची वाराणसी येथे होणार्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अकोला येथील जिल्हा क्रीडा संकुलात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत आयुष मोकाशी याने कोल्हापूर विभागाकडून खेळताना उपांत्यपुर्व सामान्यात औरंगाबाद तर उपांत्य सामन्यात मुंबईच्या बॉक्सरला हरवून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात आयुष मोकाशी याने क्रीडा प्रबोधनीच्या खेळाडूचा पराभव करुन सुवर्णपदक पटकावले. त्याला अकोल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे सतीश भट्ट आदी मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
आयुष मोकाशी याला सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सागर जगताप, सहायक प्रशिक्षक विनोद दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील, सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे हरिष शेट्टी, दौलत भोसले, रविंद्र होले, डॉ. राहूल चव्हाण, अमर मोकाशी आदी पदाधिकार्यांनी अभिनंदन करुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत आयुष मोकाशीला सुवर्णपदक
RELATED ARTICLES