सातारा : सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण अतिशय चांगले असून आरोग्य, अन्न सुरक्षा, मनरेगा, अंगणवाडी याबाबतीतही उल्लेखनीय काम करुन मानवी विकासाबाबत तुलनात्मक दृष्ट्या चांगले काम झाल्याचे गौरवोद्गार राष्ट्रीय मानव अधिकारी आयोगाच्या श्रीमती जलाजा यांनी आज काढले.
आज नियोजन भवनात जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) अविनाश शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्याचा काही भाग हा अर्वषण प्रवण क्षेत्र असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष हा नेहमीचाच प्रश्न होता पण गेली तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार अभियान अतिश्य महत्वकांक्षी हे अभियान राबवून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होवून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न मिटला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांनी यावेळी श्रीमती जलाजा यांना दिली. अंगणवाडीतील पोषण आहार, कुपोषण निर्मुलनासाठी उपयुक्त असून त्यासाठी अधिकाधिक लहान मुलांना अंगणवाडीत येण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सातारा जिल्हा हा महाराष्ट्रातला हागणदारी मुक्त पहिला जिल्हा असून आता आम्ही घनकचरा व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगून जलयुक्त शिवारासारखी लोकचळवळ करणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांनी सांगितले.
सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षणात राज्यात दुसर्या क्रमांकाचा असून आम्ही शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपाय अवलंबले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शिंदे यांनी सांगितले. स्त्री-पुरुष जन्म दराचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त आणि शहरात कमी आहे, त्यावर योग्य ते उपाय करण्याच्या सूचना श्रीमती जलजा यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापनासाठी पंचायत समिती स्तरावर अधिक लक्ष केंद्रीत करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. आरोग्याच्याबाबतीत जिल्ह्यातील व्यवस्था समाधानकारक असल्याचे सांगून ग्रामीण आरोग्यावर अधिकाधिक लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
जिल्ह्यात एकूण 30 पोलीस स्टेशन, 18 आऊटपोस्ट आहेत. जिल्ह्यातील गुन्हे निकाली काढण्याचे प्रमाण 42 टक्के असून महिलांच्या सुरक्षतेसाठी निर्भया पथक, प्रतिसाद प सुरु करण्यात आले असून यामुळे गुन्हे मोठ्या प्रमाणात आटोक्यात आल्याचे पोलीस अधीक्षक श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
महिला व बाल कल्याण, बाल कामगार, ट्रॉसिटी, कौटुंबीक छळाच्या तक्रारी, शेतकरी आत्महत्या, स्त्रीयांचे आरोग्य याबाबतही श्रीमती जलाजा यांनी सविस्तर आढावा घेतला.