नवी दिल्ली : देशातील आर्थिक राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असे वस्तू आणि सेवाकर (जीसटी) विधेयक केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेमध्ये मांडले आणि तब्बल आठ तासांहून अधिक झालेल्या चर्चेनंतर मतदान घेण्यात आले. त्यांनतर बहुमताने ते पास करण्यात आले.
राज्यसभेमध्ये या जीएसटी विधेयकावर चर्चा सुरु होती. हे विधेयक मांडताना जेटली यांनी या विधेयकासंदर्भात राजकीय मतैक्य दाखविलेल्या विरोधकांचे विशेषत: कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचे आभार मानले. काँग्रेसने सुचविलेल्या दुरुस्त्या मान्य करण्यात आल्याने या विधेयकाचा मार्ग आधीच मोकळा झाला होता. देशातील करव्यवस्थेमध्ये मुलगामी बदल घडवून आणण्यासाठी हे विधेयक महत्वाची भूमिका बजावणार आहे. याचा संपूर्ण देशाच्या अर्थकारणावर परिणाम होणार आहे.