सातारा: 2015-16 या वर्षापासून केंद्र शासनाकडून कायाकल्प पुरस्काराला सुरुवात झाल्यानंतर राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार क्रां. नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, साताराला प्रदान करून 50 लाखांचे पारितोषिक दिले होते. तद्नंतर 2016-17 वर्षासाठी हा पुरस्कार नाशिकला मिळाला. यंदा सातारा, फलटण, कराड, मेढा आणि उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी राज्यस्तरीय पथकातील डॉक्टर अनिरुद्ध देशपांडे आणि डॉ. पवार यांनी केली. यावेळी जिल्हा रुग्णालयाकडून दिल्या जाणार्या सुविधांची पाहणी करताना रुग्णालयातील वॉर्डसह वेगवेगळ्या विभागांना भेटी देत रुग्णालय प्रशासनाशी चर्चा केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, डॉ. उज्वला माने, डॉ. सुरेश पाटील उपस्थित होते.
सार्वजनिक स्वच्छता लक्षात घेता संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत कायाकल्प या पुरस्काराची केंद्र शासनाकडून सुरुवात करण्यात आली असली तरी या पुरस्काराचा राज्यातील पहिला मान सातार्याच्या रुग्णालयाला मिळाला. राज्यात डंका वाजवणार्या सातार्यातील सिव्हील हॉस्पिटलला हा पुरस्कार दिल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून निधी मात्र खर्ची न झाल्यामुळे पडून आहे. याबाबत वारंवार आंदोलने-चर्चा झाल्या असल्या तरी निधी मात्र खर्ची टाकला गेलेला नाही. त्यामुळे हा निधी पुन्हा शासनाकडे परत जाणार का, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
गेल्या दोन वर्षात रुग्णालयातील स्वच्छतेच्या बाबतीत प्रचंड पिछेहाट झाली असून अधिकार्यांचा अंतर्गत ताळमेळ नसल्याने याचा त्रास मात्र सर्वसामान्य रुग्णांना सोसावा लागतो आहे.
मागील वर्षी रुग्णालयातील वाढत्या तक्रारी पाहता तत्कालिन जिल्हाधिकारी मुदगल यांनी महसूल विभागाला रुग्णालयाची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले होते. ब्रिटिशकाळापासून सीएस हे पद जिल्हाधिकार्यांच्या दर्जाचे मानले जाते. मात्र, महसूलच्या दुय्यम अधिकार्यांनी रुग्णालयात झाडाझडती घेताना ङ्गसीएसफ यांनाच फैलावर घेतले. त्यामुळे या पदाची गनिमा मातीमोल झाल्यानेच ही परिस्थिती ओढवली असल्याच्या चर्चा वैद्यकीय वर्तुळात रंगल्या असल्या तरी कामकाजात सुधारणा होत नसल्याने नाराजीही व्यक्त केली जात आहे.
कायाकल्प पुरस्कारासाठी जिल्ह्यातील पाच ग्रामीण रुग्णालयांची तपासणी पथकाद्वारे होत असताना याबाबत गोपनियता पाळत रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही माहिती माध्यमांना देण्यात आली नाही. त्यामुळे अधिकार्यांच्या मनमानी कारभाराचे वाभाडे निघत आहेत. ज्या कर्मचार्यांनी रुग्णालयाला पुरस्कार मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला त्यांना गेल्या दोन वर्षांपासून कसलाही लाभांश न देता झुलवत ठेवणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी कर्मचार्यांमधून होत आहे. रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर डॉ. भोई यांच्याशी चर्चा करताना अधिकारी.