सातारा : थेट जनतेतून सरपंच निवडूण दिला जात आहे. सातारा तालुक्यातील केळवली- सांडवली ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच वगळता सर्व सदस्य बिनविरोध निवडूण आले होते. सरपंचपदाच्या निवडणूकीत ग्रामस्थांनी गणेश चव्हाण या उमद्या युवकाला संधी दिली आहे. सरपंच आणि सदस्यांनी गट- तट विसरुन एकदिलाने गावाच्या विकासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
केळवली- सांडवली ग्रामपंचायतीची सत्ता आ. शिवेंद्रसिंहराजे गटाने काबीज केली. सात सदस्यांपैकी आमदार गटाचे वंदना केरेकर, भगवान जानकर, शांता सपकाळ आणि कविता शिंदे हे सदस्य बिविरोध झाले होते. सरपंचपदासाठी झालेल्या निवडणूकीत आमदार गटाचे गणेश चव्हाण निवडूण आले. यानंतर नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी ग्रामस्थांसह आ. शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी जावली बाजार समितीचे संचालक राम पवार, रामचंद्र केरेकर, गोविंद केरेकर, किसन जानकर, भिमराव केरेकर, सिताराम जानकर, सिताराम केरेकर, भगवान जानकर, किसन सपकाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी आणि सदस्यांनी बांधिल रहावे. गावात विविध विकासकामे करुन ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवावा. यासाठी वाट्टेल ते सहकार्य आपण करु, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सत्कारप्रसंगी दिला. निवडणूक ही पाच वर्षातून एकदा होते. त्यामुळे निवडणूकीपुरते राजकरण मर्यादीत ठेवून नवनिर्वाचित सरपंच आणि त्यांच्या सहकारी सदस्यांनी गावाचा सर्वांगिण विकास कसा साधता येईल यासाठी प्रयत्न करावा. गट- तट बाजूला ठेवून कोणताही भेदभाव न करता एक आदर्श गाव बनवण्यासाठी सर्वप्रकारच्या शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा. गावाचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असा शब्दही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी दिला.
गट-तट विसरुन गावाच्या विकासाला प्राधान्य द्या आ. शिवेंद्रसिंहराजे ; केळवली ग्रामपंचायतीवर आमदार गटाची सत्ता
RELATED ARTICLES