तीन हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेच्या अंतिम फेरीत
रिओ डि जानिरो : भारताची ललिता बाबर महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. ललिताने 9:19:76 अशी वेळ नोंदवत तिच्या गटात चौथे स्थान मिळविले. फास्टेस्ट लूझरच्या नियमानुसार ललितालाही अंतिम फेरीसाठी संधी मिळाली आहे.
प्रत्येक गटातून पहिल्या तीन स्पर्धक अंतिम फेरीसाठी थेट पात्र ठरतात. उर्वरित खेळाडूंमधील सर्वांत चांगली वेळ नोंदविणार्या सहा स्पर्धकांनाही अंतिम फेरीत स्थान मिळते. ललिता तिच्या गटात चौथी आल्याने तिला ही संधी मिळाली.
3000 मीटर स्टीपलचेसमधील पहिल्या गटातील पहिल्या तीन स्पर्धकांची वेळ अनुक्रमे 9:12:62, 9:18:75 आणि 9:19:70 अशा होत्या. ललिताच्या गटातील पहिल्या तीन स्पर्धकांची वेळ अनुक्रमे 9:17:55, 9:18:12 आणि 9:18:71 अशी होती. ललिताची वेळ 9:19:76 अशी आहे. यामुळे फास्टेस्ट लूझरच्या नियमानुसार ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे.
63 वर्षानंतर इतिहास घडणार
1953 च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये सातारा जिल्ह्याच्या खाशाबा जाधव यांनी कुस्ती विभागात कास्य पदक मिळवले होते. त्यानंतर पुन्हा माणदेश एक्सप्रेस ललिता बाबर हिच्या रुपाने सोमवारी होणार्या अंतिम स्पर्धेत जर ललिताला पदक मिळाले तर भारतासाठी असणारा पदकांचा दुष्काळ सातार्यामुळे संपुष्टात येणार आहे. ललिता क्रीडा क्षेत्रात नवा अध्याय लिहण्याच्या दोन पावले मागे आहे. तिच्या अंतिम स्पर्धेत पोहचण्याने जिल्ह्याचे क्रीडा वर्तुळात एकच जल्लोष झाला. माण तालुक्यात ठिकठिकाणी जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ललिताने यानिमित्ताने सुधा सिंगचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत अंतिम फेरी गाठली. ललिताच्या कुटुंबियांनी कुलदैवत शंभू महादेवाला तिने सुवर्णपदक मिळवावे म्हणून साकडे घातले आहे. या श्रध्देचे चीज ललिताने आपल्या कठोर मेहनतीतून दाखवून दिले. पण खरी परीक्षा सोमवारी असणार आहे. भारताचा 70 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना ललिताला सुवर्णपदक मिळाल्यास ती देशासाठी मोठी भेट असणार आहे.