आ. शशिकांत शिंदे यांचे जनता दरबारादरम्यान स्पष्टीकरण * पक्षातील अतंर्गत वादावर लवकरच बैठक
सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या नागठाणे गटातील पोटनिवडणुकीत उमेदवार कोण असावा हा विषय खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा आहे. येथील जागावाटप मनोमिलन पॅटर्ननूसार असल्यामुळे तो त्यांचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीचा आणि नागठाणे गटातील उमेदवारीचा काहीएक संबंध नसल्यलाचा खुलासा राष्ट्रवादीचे विधानसभेतील पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शनिवारी येथील राष्ट्रवादी भवनात जनता दरबाराचे आयोजन केले होते. जनता दरबार संपल्यानंतर त्यांनी दहा ते पंधरा मिनिटे पत्रकारांशी संवांद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीअंतर्गत जिल्ह्यात अनेक तालुक्यांत सुरु असेलेली धुसफूस, जावळी तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी घेतलेली भूमिका यावरही भाष्य केले आणि लवकरच पक्षाची बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
सातारा जिल्हा परिषदेच्या नागठाणे गट पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करावयास आलेल्या अतित येथील नारायण उर्फ बाळासाहेब लोहार यांना सातारा पंचायत समितीच्या आवारात मारहाण करून त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाला असल्याबाबतची विचारणा पत्रकारांनी आ. शिंदे यांना केली असता त्यांनी यावर अगदी मोजकेच उत्तर देत हा विषय राष्ट्रवादी काँग्रेसचा नसून तो मनोलिमन पॅटर्नचा असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ङ्गसातारा तालुक्यात तत्कालीन जागावाटपानूसार नागठाणे गट उदयनराजे गटाकडे आहे. त्यामुळे तेथे उमेदवार कोण असावा हा निर्णय त्यांच्यावरच आहे. मात्र, सातारा पंचायत समितीच्या आवारात जो प्रकार घडला त्याच्याशी पक्षाचा आणि आमचा काहीएक संबंध नाही. तो त्यांचा वैयक्तिक पातळीवरील प्रश्न आहे. तेेथे उमेदवार कोण असावा हे उदयनराजेंनी ठरवायचे आहे.
सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी भक्कम जरी असलीतरी गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीचे केडर डळमळीत होत असल्याचे प्रकर्षाने समोर येत आहे. त्याबाबत पक्षाची काय भूमिका आहे, अशी विचारणा करतच जावळी पंचायत समितीचे माजी सभापती सुहास गिरी यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच शड्डू ठोकल्याचे समोर आले आहे. याबाबतही भूमिका स्पष्ट करण्याची पत्रकारांनी भूमिका मांडली. यावर आ. शिंदे म्हणाले, जावळी तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये काहीतरी सुरु असल्याचे माझ्या सकाळीच वर्तमानपत्रातील बातम्यांवरून समोर आले. यानंतर मी संबंधित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची समजूत काढली आहे. त्यांनाही आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशीही माझी चर्चा झाली आहे. लवकरच याबाबत आम्ही स्वतंत्र बैठक घेणार आहे. दरम्यान, पक्षात जिल्ह्यात अन्य कोणत्याही ठिकाणी असा प्रकार सुरु नसल्याचा दावाही आ. शिंदे यांनी यावेळी केला.
राष्ट्रवादी भवनात झालेल्या या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष सुनील माने, मुंबई बाजार समितीचे सभापती बाळासाहेब सोळस्कर, मनोज पोळ, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अॅड. नितीन भोसले, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.
रामराजे हेच जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते..!
जिल्हा परिषदेत कृषी समिती सभापती शिवाजी शिंदे यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या वेळी राष्ट्रवादीला नामुष्की पत्कारावी लागली. यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीत नाराजी असल्याची चर्चा असल्याचे आ. शिंदे यांना विचारले असता त्यांनी त्याचा इन्कार केला. ते म्हणाले, ङ्गकोणत्याही राजकीय लढाईत यश अपयश निश्चितच असते. त्यामुळे आम्ही अविश्वास ठरावातील अपयशाची लढाई फारसी मनावर घेतलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्ह्यात रामराजे यांच्या नेतृत्वाखालीच कार्यरत असून रामराजे हेच आमचे नेते आहेत. जिल्हा परिषदेतील घडामोडीवरून रामराजे यांच्या अनुषंगाने कोणतीही नाराजी नाही. मात्र, ज्यांची कोणाची त्यांच्यावर नाराजी आहे, त्याची उत्तरे त्यांनी शोधायची आहेत, असा सल्लाही त्यांनी पक्षाअंतर्गत रामराजे विरोधकांना दिला.
उदयनराजेंकडून ए.बी. फॉर्मची मागणी
सातारा जिल्हा परिषदेच्या नागठाणे गटातील पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण आहे, अशी विचारणा आ. शिंदे यांना करताच त्यांनी समृध्दी जाधव यांनी अर्ज भरताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणूनच अर्ज दाखल केला आहे. मात्र, नारायण उर्फ बाळासाहेब लोहार हे कोण आहेत त्याची मला माहिती नाही.फ दरम्यान, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे, सुनील काटकर या खासदार उदयनराजे समर्थकांनी पक्षाकडे ए.बी. फॉर्मची मागणी केली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने आणि जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी पत्रकारांना दिली.