तोडगा काढण्याचे पंकजा मुंडेंचे आश्वासन
सातारा : सातारा जिल्हा परिषदेमधील लिपीकवर्गीय कर्मचार्यांनी गेल्या सात दिवसापासून आपले लेखणी बंद आंदोलन सुरुच ठेवले असून त्याच्या या आंदोलनास आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांनी जाहीर पाठींबा दिला आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनात लिपीक कर्मचारी यांचे लेखणी बंद आंदोलनाबाबत आज आ. वैभव नाईक यांनी लक्षवेधी उपस्थित केली. यावर ग्रामविकासमंत्री सौ. पंकजा मुंडे-पाटील यांनी यांची दखल घेवून येत्या दोन दिवसात चर्चा करुन घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे.
सातारा जिल्हा लिपीक कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास शितोळे, राज्य संघटक जितेंद्र देसाई यांच्या नेतृत्वाखाली सातारा जि. प. मधील तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यामधील लिपीक कर्मचारी यांचे लेखणीबंद आंदोलन दि. 15 जुलै 2016 पासून सुरु आहे. आज सलग सातव्या दिवशीही लिपीक कर्मचार्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जि. प. च्या समोर सकाळ, दुपारी व सायंकाळी तीन वेळा निदर्शने केली. जिल्ह्यात 750 लिपीक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
सातारा पंचायत समितीमधील आवक विभाग तसेच अधीक्षक कक्षातील सर्व टेबलवर मोठ्या प्रमाणात फाईली साठल्या असून त्यावर धुळ साचली आहे. कामानिमित्त पं. स. मध्ये लोक रोज येत आहेत. मात्र, लिपीक कर्मचार्यांचे लेखणी बंद आंदोलन सुरुच असल्याने लोकांना मोकळ्या हाताने घरी परतावे लागत आहे.
सातारा जिल्हा परिषदेमधील अर्थ व शिक्षण विभाग, समाज कल्याण विभाग, आरोग्य विभाग, कृषि विभाग, बांधकाम विभाग, प्रशासन विभागात संपूर्ण शुकशुकाट जाणवू लागला आहे. आवक विभागात टपाल मोठ्या प्रमाणात साठली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या सभेत पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली काही महत्वाचे ठराव घेण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी करताना लिपीकांच्या लेखणी बंद आंदोलनामुळे मोठा परिणाम झाला आहे.
सातारा, कराड, पाटण, कोरेगाव, दहिवडी, फलटण, महाबळेश्वर, मेढा येथील पंचायत समितीमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. पावसाळी अधिवेशनात आज आ. वैभव नाईक यांनी लिपीकांच्या प्रलंबित मागण्याबाबत लक्षवेधी सादर केल्यामुळे लवकरच लिपीक कर्मचार्यांना न्याय मिळेल अशी चर्चाही संघटनेच्या पदाधिकारी वर्गात दिवसभर सुरुच होती.
लिपिक बंदची विधानसभेत लक्षवेधी
RELATED ARTICLES