सातारा, दि.12 (जिमाका) :- मतदान जनजागृतीचे (स्वीप) काम जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने केले आहे. अशा पद्धतीने यापुढेही काम करावे. मतदान जनजागृतीसाठी छापण्यात येणाऱ्या प्रत्येक बॅनवर, स्टीकवर 23 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे, असा उल्लेख करावा अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसकर यांनी आज दिल्या.
लोकसभा निवडणूक-2019 च्या अनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल, पुणे विभागीय उपायुक्त संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्ष प्रमुख साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता आदी यावेळी उपस्थित होते.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी यापुढेही जनजागृतीचा कार्यक्रम सुरु ठेवावा, असे सांगून ज्या मतदान केंद्रावर मतदान कमी झाले आहे, अशा मतदान केंद्रावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करा. या ठिकाणी मतदान जनजागृतीचा कार्यक्रम घ्या व मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा.
दिव्यांग, गरोदर महिला, वयोवृद्धांना थेट मतदान कक्षात प्रवेश
दिव्यांग मतदारांना मतदानाच्या दिवशी कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. यासाठी त्यांना विविध प्रकारच्या सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. तसेच गरोदर महिलांना वयोवृद्धांना मतदान केंद्रावर रांगेत आता उभे रहावे लागणार नाही. मतदान केंद्रावर आल्यावर त्यांना मतदान कक्षात प्रवेश दिला जाणार असल्याचेही विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसकर यांनी यावेळी सांगितले
लोकसभा निवडणुकीत महिलांच्या मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना करुन डॉ. म्हैसकर पुढे म्हणाले, मतदान टक्क्का वाढविण्यासाठी केबल टीव्ही, सिनेमागृहाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. जनजागृतीच्या प्रत्येक साहित्यावर सकाळी 7 ते सायंकाळी 6 मतदान होणार असल्याचे नमुद करा. एकही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, यासाठी दिव्यांग मतदारांना मतदनासाठी वाहनाची व्यवस्था केली आहे, याची मोठ्या प्रमाणात जनजागृती करा, अशा सूचनाही डॉ. दिपक म्हैसकर यांनी शेवटी केल्या.
या बैठकीनंतर चारा टंचाई, वृक्ष लागवडीचे नियोजन व पाणी टंचाईसंदर्भात सविस्तर आढावा घेतला.
या बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

