सातारा : मल्लखांब हा मातीशी घट्ट नाते धरून ठेवणारा आणि त्याचवेळी आकाशात झेप घेण्याचे कौशल्य साध्य करणारा खेळ आहे. यामुळे मल्लखांब आता केवळ काही देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही तर तो जागतिक पातळीवर खेळला जात आहे. यासाठी आता या खेळाचा ऑलिंपिकमध्येही समावेश झाला पाहिजे अशी अपेक्षा आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली.
यशोदा टेक्निकल कॅम्पस वाढे फाटा येथे 34 व्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धांचे उदघाटन आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे होते. यावेळी मल्लखांब फेडरेशन ऑफ इंडियाचे ( एमएफआय ) अध्यक्ष डॉ. रमेश इंदोलिया, एमएफआयचे सचिव नारायण कु-हाडे, एमएफआयचे खजिनदार दिलीप गव्हाणे, विश्व मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष उदय देशपांडे, महाराष्ट्र अमॅच्युअर मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष राजाभाऊ अधिकारी, उपाध्यक्ष सुभाष डोंगरे, कार्याध्यक्ष उत्तमराव लटपटे, सातारा जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र देवकर, एमएफआयचे कोर कमिटी सदस्य सुजीत शेडगे, यशोदा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. नरेंद्र नार्वे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते विश्वतेज मोहिते, विक्रांत दाभाडे आदी उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक नगरीत मल्लखांबाला अनन्यसाधारण महत्व आहे. अनेक खेळ ऑलिंपिकमध्ये स्थान मिळवत असताना मल्लखांबासारखा खेळही ऑलिंपिकमध्ये समाविष्ट करून घेतला पाहिजे. यासाठी संघटनेबरोबरच खासदार शरद पवारांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. मनापासून आणि हृदयापासून हा खेळ खेळला गेला तर त्यामध्ये नक्कीच यश मिळविता येईल. विविध राज्यातून आलेल्या खेळाडूंनी या परिसराचीही माहिती घ्यावी. येथील ऐतिहासिक स्थळांना भेटी द्याव्यात. त्यातूनही त्यांना खेळासाठी नवी ऊर्जा मिळेल. एमएफआयचे अध्यक्ष डॉ. रमेश इंदोलिया म्हणाले, देशभरातून साता-यामध्ये खेळाडू आले आहेत. याठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन झाले आहे. देशपातळीवरील अनेक खेळांना वेगवेगळ्या सुविधा मिळत आहेत. त्याप्रमाणे मल्लखांबालाही चांगल्या संधी निर्माण होतील यासाठी एमएफआयच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. मल्लखांबासाठी महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. त्यामुळे या खेळाच्या विकासाला या मातीत चांगले दिवस आहेत. यशोदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे म्हणाले, देशपातळीवरील स्पर्धा यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये आयोजित करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आमच्याकडून होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातारा जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र देवकर यांनी केले तर यशोदा इंजिनिअरिंगचे प्राचार्य प्रा. डॉ. एन. जी. नार्वे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कॅम्पसचे संवाद व जनसंपर्क संचालक प्रा. दीपक शिंदे यांनी केले. तर यशोदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.
कार्यक्रमाला सुमारे 22 राज्यातील 450 हून अधिक विद्यार्थी, त्यांचे प्रशिक्षक, यशोदा टेक्निकल कॅम्पसमधील इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, एमबीए, एमसीएचे विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.
मल्लखांबाला ऑलिंपिकमध्ये स्थान मिळणे आवश्यक : आ. शिंदे
RELATED ARTICLES