Saturday, March 22, 2025
Homeठळक घडामोडीमाण देशी महोत्सवाचे 23 ते 27 नोव्हेंबर रोजी आयोजन

माण देशी महोत्सवाचे 23 ते 27 नोव्हेंबर रोजी आयोजन

सातारा : माण देशी महोत्सव 2017 या कार्यक्रमाचे आयोजन सातारा येथे गुरूवार  ते सोमवार  23  नोव्हेंबर ते 27  नोव्हेंबर 2017 दरम्यान केले आहे.  हा माण देशी महोत्सव सातारा जिल्हा परिषद मैदान येथे सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत संपन्न होणार आहेे. अशी माहिती चेतना सिन्हा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 
माणदेशी महिलांना हक्काची बाजारपेठ मिळावी या उद्देशाने तसेच सातारकरांना माण व खटाव मधील माणदेशाची खासियत असलेले व कुठेही सहजासहजी उपलब्ध होत नसलेले माणदेशी जेन,  घोंगडी, दळण्यासाठी जाती व खलबत्ते, केरसुण्या, दुरडया, सुपल्या, हे साहित्य व माणदेशी गावरान ज्वारी, बाजरी, देशी मटकी, मूग, सेंद्रिय हळद, बेडगी मिरची पावडर इ. आणि विशेषत: महिलांसाठी खास इरकली साडया यांचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन देखील या महोत्सवात करण्यात येणार आहे.  
कार्यक्रमामध्ये माण, खटाव तसेच सातारा जिल्हयातून महिला व शेतकरी यांचा सहभाग असणार आहे.  सुमारे दोनशे हून अधिक स्टॉल भरविले जाणार आहेत. माणदेशी महोत्सवाच्या निमित्ताने विविध मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.  दि. 23 नोव्हेंबर 2017 रोजी सायं 5.00 वाजता माण देशी महोत्सव उद्घाटन सोहळा प्रसिध्द लेखिका व सिने अभिनेत्री अमृता सुभाष व सौ.श्‍वेता सिंघल , जिल्हाधिकारी सातारा यांच्या हस्ते होणार आहे. तसेच महिलांना शिलाई मशीन वाटप कार्यक्रम संपन्न होणार आहे. 
यशस्वी देशी उद्योजिकांच्या यशोगाथा व त्यांचे वास्तव अनुभव त्यांच्याच तोंडून ऐकण्याची अपूर्व संधी दि. 25  नोव्हेंबर2017 रोजी सायं 04 वाजता माण देशी उद्योजिका पुरस्कार सोहळा या कार्यक्रमाद्वारे इतर महिलांना उद्योग व्यवसायामध्ये प्रेरणा मिळण्याच्या प्रमुख उद्देशाने ऐकण्याची संधी प्राप्त होणार आहे. सिने अभिनेत्री सौ. निवेदिता सराफ  या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत व त्यांच्या हस्ते सातारा जिल्हयातील 17 माण देशी उद्योजिकांचा सन्मान करून सत्कार घेण्यात येणार आहे. सोबत माणदेशी गजीनृत्याचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे. 200 ग्रामीण शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहे. यापूर्वीही माण देशी फौंडेशनने विषेशत: गरजू विद्यार्थींनींना सुमारे 9000 सायकलींचे मोफत वाटप केलेले आहे. तसेच माण देशी बँकेच्या मोबाईल अ‍ॅपचे उद्घाटन होणार आहे.
माणदेशी फौंडेशनने महिला उद्योजिका हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रम अंतर्गत ग्रामीण भागातील  विद्यार्थींनी व महिलांना संगणकाचे प्रशिक्षण गावपातळीवर स्वत:च्या घरानजिक व शाळेच्या परिसरात मिळावे, प्रत्येक महिला व विद्यार्थींनी संगणक साक्षर व्हावी या हेतूने गेली सात वर्षापासून फिरती व्यवसाय व संगणक प्रशिक्षण शाळा कार्यरत ठेवलेली आहे. या उपक्रमाअंतर्गत संगणक प्रशिक्षणाच्या मोबाईल बस व्यवसाय शाळा कार्यरत आहेत.  या बसमध्ये संगणक, शिलाई मशिन्स व ब्युटी पार्लरची सुविधा  उपलब्ध केली आहे. माणदेशी महोत्सवाचे औचित्य साधून या अत्याधुनिक मोबाईल बस व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेस पाहुणे भेट देणार आहेत.    
माण देशी फौंडेशनचा म्हसवड येथे माण देशी चॅम्पियन्स् हा  उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये  माण देशी खेळाडूंनांं जिल्हयात, राज्यात, देशात व परदेशातही स्थान मिळावे या उद्देशाने या क्रिडा संकुलनात तसेच देश विदेशात या ंं मुलांना विविध प्रकारचे तज्ञ प्रशिक्षकांतर्फे क्रिडा प्रशिक्षण दिले जात आहे. या उपक्रमातंर्गत आतापर्यंत 4000 खेळाडूंना यशस्वी प्रशिक्षण दिले आहे व त्यामधील 150 खेळाडू जिल्हा, विभागीय ,राज्य व राष्टी्रय पातळींवर निवड झालेली आहे.तसेच क्रिडा क्षेत्राच्या माध्यमातून 35 खेळाडूंना नोकरीची संधी मिळालेली आहे. दि.26 नोव्हेंबर 2017 रोजी सातारकरांना झी मराठी फेम दुर्गेश नंदिनी प्रस्तुत गजर महाराष्ट्राचा हा लोककला व लावणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावर्षीचा खास आणि विषेश कार्यक्रम म्हणजे सातारा जिल्हा परिषद व माण देशी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्यातील बचत गटाच्या महिला, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन , शिबिरे व प्रशिक्षण कार्यक्रम दि. 24  नोव्हेंबर ते 27  नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 10 ते सायं. 04.00 वाजेपर्यंत आयोजन केलेले आहे. गेल्यावर्षी 2016 माण देशी फौंडेशनने सातारा येथे माण देशी महोत्सवाचे आयोजन केले होते. या उपक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला होता. या महोत्सवात माण खटाव मधील उत्कृष्ट प्रतीची ज्वारी व बाजरी, माणदेशीची खासियत असलेले जेन, घोंघडी, इरकल साडया, या चोळीचे रेशमी खण याबरोबरच देशी मटकी ,हरभरा, गहू, पिवळे-हिरवा मुग, हुलगा, कावळया , सुप, दुरडया, केरसुण्या, जाती खलबत्ती, शेवया, हळद पावडर, विविध प्रकारचे कपडे, मातीच्या चुली, शेगडया, मडकी व माणदेषी लवंगी मिरची, केळी़ सेद्रिय गुळ, काकवी, भाजणीची चकली़ चिवडा माणदेशी फळांचा जाम,भाजके फुटाणे व वाटाणे, देशी मिरचीचा खरडा व बाजरीची चुलीवरील भाकरी, चटकदार झुणका-भाकर, पुरणपोळी माणदेशी कांदा व बटाटे भजी, माणदेशी झणझणीत मिसळ, खाकरा इ. खादय पदार्थ विक्रीची सुविधा केलेली होती.  ग्राहकांच्या भरघोस प्रतिसादामुळे यंदाही या माण देशी महोत्सवात खवय्येंना या खादय पदार्थांची चव चाखण्याची संधी उपलब्ध होणार आहे.   
आपला व्यवसाय वाढविण्यासाठी शेतकरी व महिला उद्योजकांना खास संधी आहे. गेल्यावर्षी सातारा येथे झालेल्या माण देशी महोत्सवास मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून  महिलां आणि शेतक-यांच्या आग्रहानुसार यंदाही माणदेशी महोत्सवाचे 23 ते 27 नोव्हेंबर 2017  सातारा जिल्हा परिषद मैदान, सदर बझार, सातारा येथे आयोजन केले आहे. याचा सातारकरांनी व विक्रेत्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन माण देशी फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular