सातारा: सातारा जिल्ह्यातील विविध रस्त्यांची सध्या खूपच दयनिय झाली असून गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांवरील खड्डे न भरल्याने लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत,अशा परिस्थितीत संपूर्ण जिल्ह्यातील रस्ते खड्डेमुक्त करावेत, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आणि मनसे स्टाईलने गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करावे लागेल, असा इशारा मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांनी दिला आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागासह प्रशासनास दिलेल्या निवेदनात संदीपदादा मोझर यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर एकच नव्हे तर मोजता येणार नाही इतक्या संख्येने असलेल्या लहान मोठ्या खड्ड्यांमुळे जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो, अशी स्थिती आहे. दूचाकी वाहने घसरण्याचे तसेच मोठ्या वाहनांची चाके खड्ड्यात अडकून बसण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. खड्डे चुकवून वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. वाहनावरील नियंत्रण न राहिल्याने होणार्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. असे प्रकार वारंवार घडत असतात. प्रत्येक अपघातग्रस्त पोलिस, प्रशासन व प्रसार माध्यमांकडे धाव घेत नसल्याने सर्वच अपघात उघडकीस येत नाहीत. मात्र, केवळ रस्त्याच्या दूर्दशेमुळेच हे अपघात घडून येत आहेत. त्यामुळे तातडीने रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत आपण बांधकाम विभागास आदेश द्यावेत, तसेच वळणावरील अडथळा ठरणार्या वाहनांच्या फांद्या हटवाव्यात, अशी आमची मागणी आहे.
सातारा-पंढरपूर, सातारा-केळघर-महाबळेश्वर, कराड-पुसेसावळी, कराड-मसूर, लोणंद-शिरवळ, लोणंद-खंडाळा, वाठारस्टेशन – लोणंद, सातारा-वाई, सातारा- पाटण, सातारा-कराड, सातारा- रहिमतपूर, सातारा- मायणी, पुसेसावळी – कोरेगाव, पुसेसावळी – कळंबी, पुसेसावळी – मायणी, मोरगिरी – पाटण, ओगलेवाडी- सुर्ली, मसूर- शामगाव, निसरेफाटा-दिवशी, निमसोड-वडूज, कराड-दहिवडी, सातारा- सज्जनगड आदी रस्त्यांची अवस्था तर खूपच दयनीय झाली आहे. वेळोवेळी निवेदने देऊन आणि लहान- मोठ्या अपघातांनंतर जनक्षोभ वाढूनसुद्धा शासन याप्रश्नी कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याने शासनाला हे रस्ते दुरुस्त करायचेच नाही की काय? असा संभ्रम निर्माण व्हावा, अशी स्थिती आहे. केवळ तात्पूर्ती मलमपट्टी करुन खड्डे भरले जातात.
मात्र, कोणतेही दर्जेदार साहित्य न वापरता माती व मुरुमाने खड्डे भरुन रस्त्याची डागडुजी करण्याचा देखावाच बांधकाम विभागाकडून होत आहे. केवळ ठेकेदारांची बिले काढणे, बिले काढण्यासाठी कमिशन घेणे आणि वरचेवर टेंडर काढून शासनाच्या पैशाला मातीमोल करण्याचाच प्रकार यंत्रणेकडून होत आहे, असा आरोपही या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे. येत्या 15 दिवसात जिल्ह्यातील सर्व रस्ते दुरूस्त न झाल्यास 16 व्या दिवशी या प्रश्नी आम्ही मनसे स्टाईलने आणि गनिमी कावा पध्दतीने आंदोलन करू, त्याबाबत होणार्या नुकसानीस शासनच जबाबदार असेल. असा लेखी इशाराही या निवेदनात संदीपदादा मोझर यांनी दिला आहे. या रस्त्यांच्या दुरूस्तीबाबत वेळोवेळी आवाज उठवूनही सार्वजनिक बांधकाम विभाग डोळ्यावर पट्टी बांधून या प्रश्नाकडे डोळेझाक करीत असल्याची भावना सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. त्यामुळे मनसेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करुन बांधकाम विभागासह प्रशासनास सळो की पळो करुन सोडणार असल्याचेही संदीपदादांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
निवेदन देताना मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांच्यासमवेत सचिन पवार, मधुकर जाधव, बाळकृष्ण तात्या पिसाळ, सुभाषमामा चौधरी, दिलीप तात्या सुर्वे, राहुल पवार, राजेंद्र बावळेकर, अश्विन गोळे, चंद्रकांत बामणे, शिवाजी कासुर्डे, सागर बर्गे, आशिष चोरगे, ओमकार नावेलकर, संतोष गोळे, चंद्रकांत पवार, अमित यादव, दिलीप सोडमिसे, अधिक सावंत, देवेंद्र कणसे, सुशिल कदम आदी उपस्थित होते.