
फलटण: जब तक सूरज चाँद रहेगा नीलेश तुम्हारा नाम रहेगा भारत माता की जय या घोषणा देत फलटण तालुक्यातील तरडगाव येथील जवान नीलेश चव्हाण यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढीत अंत्यविधी पार पाडण्यात आला.
पंजाब येथील भटिंडा या ठिकाणी देश सेवेसाठी कार्यरत असताना शुक्रवारी हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने जवान नीलेश चव्हाण यांचे निधन झाले होते. शुक्रवारपासून तरडगावकर पार्थीवाच्या प्रतीक्षेत होते. आज रविवारी सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी पार्थिव दाखल झाले. हे पार्थिव प्रकाश पुजारी या सुभेदार यांनी आणले.
गावांत पार्थिव आल्याची खबर मिळाल्याने सपूर्ण गावच एका ठिकाणी एकवटला गेला तर जवान नीलेश चव्हाण यांच्या कुटुंबातील पत्नि आई वडील यांनी अश्रुंचा हंबरडा फोडला. सकाळी 8.30 वाजता अंत्ययात्रेला सुरुवात झाली. सजविलेल्या ट्रॉलीत गावातून घोषणा देत अंत्ययात्रा काढण्यात आली. पालखी तळ या ठिकाणी शेवटी पार्थिवाला मुलगा आदर्श याने अग्नि दिला. शोकाकुल झालेल्या वातावरणात संपूर्ण तरडगाव गहिवरुन गेले. आर्मी त भरती होण्यासाठी धडपड करणारे तरुण मुले ही हा अंत्यविधी पाहताना गहिवरले. तसेच शालेय विद्यार्थी यांनी अंत्ययात्रेत सहभाग दर्शविला.
यावेळी आ. दीपक चव्हाण, प्रांत संतोष जाधव, तहसीलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी विजय जाधव, पंचायत समिती सभापती रेश्मा भोसले, जि. प. सदस्य दत्ता अनपट, जि. प. सदस्या विमलताई गायकवाड़, रणजीत सिंह नाईक निंबाळकर, दिगंबर आगवणे, माजी सभापती वसंत काका गायकवाड़, सासवडचे सरपंच सौ कुंभार, सरपंच रेश्मा गायकवाड़, सौ वेणुताई चव्हाण हायस्कूल मुख्याध्यापक एस. पी. पाटील आदिसह हजारो लोक उपस्थित होते.