सातारा : स्व. भाऊसाहेब महाराजांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून अजिंक्यतारा साखर उद्योगाची स्थापना केली. शेतकरी, सभासद आणि ऊस पुरवठादार शेतकर्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कारखान्याचे संचालक मंडळ नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. कारखाना व्यवस्थापनाने सुरुवातीपासूनच शेतकरी हिताची धोरणे राबवली असून ऊसाला जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाही कारखान्याने एकरकमी एफआरपी देण्याचा निणर्य घेतला असून ऊसदर नियंत्रण मंडळाच्या मान्यतेनुसार एफआरपीव्यतीरीक्त अधिकची 175 रुपये प्रतीटन रक्कम देणार असल्याची ग्वाही कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या 2016-17 या 33 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, कार्यकारी संचालक संजीव देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे ज्येष्ठ सभासद शंकर पवार, सुलोचना पवार, नानासाो इंदलकर, सुरेखा इंदलकर, आबा अंतू घाडगे, तारूबाई घाडगे, लक्ष्मण यादव, विमल यादव, अनिल बर्गे, शालन बर्गे या उभयतांच्या शुभहस्ते गव्हाणीचे विधीवत पूजन करून गव्हाणीमध्ये ऊसाची मोळी टाकून करण्यात आला.
यावेळी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले म्हणाले, मागील वर्षाच्या दुष्काळजन्य स्थितीमुळे ऊस पिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊन पर्यायाने ऊसपीकाच्या हेक्टरी टनेजमध्ये घट होईल. त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम हा कसोटीचा राहणार आहे. दुष्काळजन्य स्थितीमुळे निर्माण झालेली ऊसाची कमतरता विचारात घेता ऊसाची पळवा पळवी होणार असून, अशा स्थितीमध्ये इतर कारखान्याने ऊस नेहण्यासाठी शेतकर्यांना वाढीव ऊसदराचे प्रलोभन देतील. अशा फसव्या प्रलोभनांना आपल्या ऊसउत्पादकांनी बळी न पडता आपला ऊस आपल्याच कारखान्यास गाळपासाठी देऊन, गाळप हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यास व गाळपाचे उद्दीष्ट परिपुर्ण होण्यास सहकार्य करावे असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले. आपल्या कारखान्याने नेहमीच ऊस पुरवठादार शेतकर्यांना एफ.आर.पी. प्रमाणे दर दिलेला असून, यंदाच्या गाळप हंगामाकरिता एफ.आर.पी. प्रती मे.टन 2428 रुपये प्रमाणे निश्चित झालेली आहे. याप्रमाणे पहिली उचल एकरकमी देण्याचे जाहिर केले आहे. याशिवाय एफआरपी पेक्षा अधिकचा हप्ता देण्यासंदर्भाने कोल्हापूर विभागामध्ये शेतकरी संघटना, शासन प्रतिनीधी व कारखाना प्रतिनीधी यांच्या संयुक्त बैठकित झालेल्या निर्णयाप्रमाणे एफआरपी पेक्षा अधिक 175 रुपये प्रती मे.टन देण्याचे ठरले असून ऊसदर नियंत्रण मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर तातडीने कार्यवाही केली जाईल, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले.
कारखान्याचे कामगार, कर्मचारी यांचा कारखान्याच्या जडणघडणीमध्ये सिहांचा वाटा असून, कारखाना व्यवस्थापन व कर्मचारी यांचा संबंध नेहमीच सलोख्याचा, सौहार्दपूर्ण व एकमेकास पूरक असा राहिलेले आहे. कामगारांच्या बाबतीत व्यवस्थापनाने कधीही आखडते धोरण घेतलेले नसून, त्यांच्याबाबतीत हिताचे व योग्य निर्णय घेतलेले आहेत. यंदाच्या दिपावली सणाकरिता कामगार, कर्मचार्यांना 20 टक्के प्रमाणे भरीव उंच्चाकी बोनस देण्यात आला आहे. यंदाच्या हंगामासाठी एकूण 8,708 हेक्टर ऊसाची नोंद झाली असून, अंदाजे 4.50 लक्ष मे.टन ऊस गाळपास उपलब्ध होईल. असे असले तरी या हंगामात गाळपाचे 5.00 लक्ष मे.टन उद्दीष्ट ठेवण्यात आले असून, ते पुर्ण करण्यासाठी कारखान्याने शेती विभागामार्फत आवश्यक ती परिणामकारक उपाययोजना केलेली आहे. ऊस पुरवठादार शेतक-यांना दरवर्षी योग्य व किफायतशीर ऊसदर देता यावा, कारखान्याचे उत्पन्न वाढावे यासाठी काटकसरीचे धोरणांतर्गत डिस्टीलरीचे आधुनिकीकरण केलेले आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वास शेडगे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कारखान्याचे कामकाज प्रगती पथावर नेहण्यास आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या रुपाने योग्य व कल्पक नेतृत्व लाभल्यामुळेच आज कारखान्याचे कामकाज प्रगतीपथावर असल्याचे शेडगे म्हणाले. संचालक नितीन पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सतीश चव्हाण, सदस्य जितेंद्र सावंत, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी कृषी सभापती किरण साबळे-पाटील, पंचायत समिती सभापती कविता चव्हाण, सदस्य आनंदराव कणसे, राहूल शिंदे माजी सभापती धर्मराज घोरपडे, नारायण कणसे, तानाजीराव तोडकर, माजी उपसभापती अरविंद चव्हाण, दादा शेळके, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गणपतराव शिंदे, जिल्हा खरेदी विक्री संघ अध्यक्ष अॅड.सुर्यकांत धनावडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विक्रम पवार, वाहतूक संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण फडतरे, सातारा जिल्हा बँकेच्या संचालिका सौ.कांचन साळुंखे, कारखाना कामगार युनियनचे अध्यक्ष धनवे महाराष्ट्र राज्य साखर कारखाना प्रतिनिधी मंडळ सचिव सयाजी कदम, आदी मान्यवरांसह कारखान्याचे आजी, माजी संचालक, अजिंक्य उद्योग समुहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, ऊस-उत्पादक-शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, कारखाना अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.