साताराः रस्ता नसलेल्या, दुर्गम किल्ल्यांवर महाराष्ट्रभरातून शिवभक्त येतात अन् दोन दिवस जे शिवतांडव चालते ते अद्भूत-विलक्षण आहे. शेकडो वर्षांत जिथं कोणी फिरकले नाही तिथं हजारो लोकांची राहण्या-जेवणाची व्यवस्था होऊच कशी शकते? कंगव्यापासून पकवांन्नापर्यंत हे शक्य आहे सगळं…? अशा एकामागूनएनक प्रश्नांची सरबत्ती करत पद्मविभूषण खासदार शरद पवार यांनी स्वागताध्यक्ष सरदार विक्रमसिंह पाटणकर सरकार व निमंत्रक दीपक प्रभावळकर यांच्याकडून दुर्ग संमेलनाचे अंतरंग जाणून घेतले.
यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, सत्यजित पाटणकर सरकार, पहिल्या दुर्ग संमेलनाचे कार्याध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील, दुस़र्या दुर्ग संमलेनाचे कार्याध्यक्ष शशिकांत शिंदे, तिसऱया संमेलनाचे उद्घाटक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, नरेंद्र पाटील उपस्थित होते.
दातेगडावर पार पडलेल्या चौथ्या दुर्ग संमेलनाचा डंका साऱया राज्यभर पिटला गेला, त्याबद्दल खासदार पवार यांनीही कुतूहल व्यक्त केले. यावेळी त्यांच्याहस्ते स्वागताध्यक्ष पाटणकर सरकार यांना संमेलनातील मानाचे शिल्ड बहाल करण्यात आले.
आजवर देशभरातील कार्यक्रम-उपक्रम पाहिले पण दुर्ग संमेलनासारखा उपक्रम पहिल्यांदाच ऐकत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागवणारी ही योजना कल्पनेपलिकडची आहे. राज्यातील हजारों शिवभक्त व दुर्गप्रेमींना एकत्रित आणून ज्या प्रकारे हे नियोजन साधले जाते ते थक्क करणारे आहे. खरंच, या संमेलनात शिवभक्तांचा कस लागत असेल, असेही खासदार पवार म्हणाले. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी सदाशिवगडावरील पहिल्या दुर्ग संमलेनाच्या आठवणी सांगितल्या तर शिवेंद्रसिंहराजेंनी वसंतगडावरील अवघड व अनवट श्रमदानातील किस्से कथन केले.
संमेलनांसाठी आधी जिल्हयातील गड-किल्ल्यांवर जाः रामराजे नाईक निंबाळकर
दुर्ग संमेलनाची मागणी आता राज्यभरातील विविध गड-किल्ल्यांवर होत असली तरी आधी सातारा जिल्हयातील गड-किल्ल्यांवर दुर्ग संमेलने होऊ देत अशी अपेक्षा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली. सातारा जिल्यातील अनेक दुर्गम किल्ल्यांवर शिवकाळाच्या आठवणी बंदिस्त झाल्या आहेत, त्यांना यानिमित्ताने उजाळा देण्याचा प्रयन्त करूयात असेही ते म्हणाले.
दातेगडाला जिर्णोद्धाराचा मॉडेल फोर्ट बनवणार-सत्यजितसिंह सरकार
खासदार शरद पवार यांनी संमेलनाच्या नियोजनासोबतच दातेगडाची माहिती जाणून घेतल्यावर उत्स्फुर्त भरभरून कौतुक केले. यावेळी संमेलनाच्या निमित्ताने दातेगड आता प्रकाशात आला आहे. मोठे काम उभे राहिले आहे. यापुढेही गडाच्या जिर्णोद्धारासाठी पक्षविरहित संघ-संघटनाविरहित प्रयत्न करणार असून दातेगड हा गड-किल्ल्यांच्या जिर्णोद्धाराचा मॉडेल फोर्ट बनवू, अशी ग्वाही यावेळी सत्यजितसिंह पाटणकर सरकार यांनी दिली.
(कॅप्शन-दुर्ग संमेलनाचे स्वागताध्यक्ष विक्रमसिंह पाटणकर सरकार यांना शिल्ड बहाल करताना पद्मविभूषण खासदार शरद पवार सोबत दीपक प्रभावळकर.)