सातारा : सातारा शहरातील घंटागाडी चालकांचा प्रश्न आता चिघळण्याच्या मार्गावर आहे. भूमीपुत्र असणार्या घंटागाडी चालकांचे नियंत्रण पालिकेऐवजी ठाणे येथील साशा कंपनीकडून विनाकरार होणार असल्याने पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील घंटागाडी चालकांनी रविवारपासून बेमुदत घंटागाडी बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. या विषयावर तातडीने तोडगा न काढल्यास त्यांनी आत्मदहन आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने शहर स्वच्छतेच्या अडचणी वाढल्या आहेत.
शनिवारी घंटागाडी चालकांनी अतिरिक्त जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करून आगामी आंदोलनाची कल्पना दिली. निवेदनात चाळीस घंटागाडी चालकांनी सर्व परिस्थिती विस्तृतपणे विषद केली आहे. पालिकेने आमच्यावर ठेकेदार नेमला असून कोणत्याही करा राशिवाय आमच्यावर जाचक अटी लादण्यात आल्या आहेत गेल्या 16 वर्षापासून सातारा शहराच्या स्वच्छतेत आमचे योगदान आहे. मात्र घंटागाडीवर आमच्या कुटुंबाचा चरितार्थ अवलंबून आहे तसेच गाडीचे हप्ते बँकांकडे सुरू आहेत. मात्र नगरपालिकेकडून अर्थार्जनाच्या स्त्रोतात फरक करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. सातारा शहराला स्वच्छतेचा तीन वेळा पुरस्कार मिळाला त्यामध्ये आम्हा घंटागाडी चालकांचा खारीचा वाटा आहे. सातारकरांसाठी अल्प मोबदल्यात काम करणार्या स्थानिक घंटागाडी चालकांचा आवाज दाबला जात असून आम्हाला साशा कंपनीच्या माध्यमातून डावलण्याचा प्रयत्न आहे याची दखल नगरपालिका व जिल्हा प्रशासन यांनी न घेतल्यास जी परिस्थिती निर्माण होईल त्याला पालिका जवाबदार राहिल आम्हाला न्याय न मिळाल्यास जिल्हा प्रशासनाच्या दरवाजात आत्मदहन आंदोलन करण्यात येईल असा इशारा घंटागाडी चालकांनी दिला आहे.
घंटागाडी चालकांचे लाक्षणिक उपोषण
येत्या पाच तारखेपासून सातारा शहराची स्वच्छता मसाशा म कडे सोपवण्यात आली असून त्या विरोधात घंटागाडी चालक एकवटले आहेत. भाजपने हा मुद्दा नेमका उचलून धरला आहे . नगरसेविका सिध्दी पवार यांच्या नेतृत्वाखाली घंटागाडी चालकांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांना निवेदन दिले. साशाच्या विरोधात घंटागाडी चालकांनी रविवारपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे .तसेच आमच्या शिवाय दुसर्या कोणाचीही गाडी बोगद्याच्या पुढे जाऊ देणार नाही असा पवित्रा घंटागाडी चालकांनी घेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लाक्षणिक उपोषण केले.