भिलार : शासकीय नियम धाब्यावर बसवुन पाचगणी पर्यटनस्थळावरील हेरीटेज वास्तुंच्या जपणुकीपेक्षा त्या वास्तु विद्रूप करण्याचा घाट घालणार्या धनिकांकडून एको सेन्सिटिव्ह झोन व हेरीटेजच्या नियमांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. डोळ्यावर पट्टी लावलेल्या गांधारीच्या भुमिकेतील प्रशासन या बांधकामावर काय कारवाई करणार? याचीच उत्सुकता पाचगणीकरांना लागली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाचगणी या पर्यटनस्थळावर मुख्य बाजारपेठेसह बर्याचशा वास्तु ह्या हेरीटेजमध्ये मोडतात. हेरीटेजच्या शासकीय नियमाप्रमाणे या वास्तु आहे. तशा स्थितीत जतन कराव्यात त्यांची डागडुजी करताना त्यांचा जुना बाज कायम ठेवुन त्याची दुरूस्ती परवानगी घेऊन करावी. अशा वास्तुमध्ये वास्तव्यास असणार्या गोर गरीबांनी मात्र आहे. त्याच वास्तुमध्ये राहण्याचे मान्य केले आहे. परंतु मुख्य बाजारपेठेत नियमांना पायदळी तुडवत एका हेरीटेज वास्तुला धनदांडग्याने बिनधास्तपणे आपल्या मनाप्रमाणे आकार देण्याचा घाट चालु केला आहे. याबाबत प्रशासन यंत्रणाही यावर मुग गिळून गप्प आहे. याचे गौडबंगाल काय आहे ? याचीच चर्चा पाचगणी शहरात रंगु लागली आहे.
सर्वसामान्य स्थानिकांनी असा प्रयत्न केल्यास त्याचेवर नियमांचा धाक दाखवत कारवाईचा बडगा उचलला जातो मग अशा धनदांडग्याच्या या कामावर यंत्रणा कशी मेहेरबान आहे? छत्रपती शिवाजी चौकात हे काम राजरोसपणे चालु आहे. पाचगणी हे शहर पर्यटनस्थळ व शैक्षणिक केंद्र असल्याने आणि एको सेन्सीटीव्ह झोन असल्याने बरेच नियम या शहराला लागु आहेत. हेरीटेजमध्ये येणार्या वास्तु जपण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. बर्याचशा अशा वास्तु ह्या शहराच वैभव आहे. या वास्तु आता काही नतद्रष्ट्यांकडून काळाच्या ओघात नष्ट होऊ लागल्या आहेत. पाचगणीत सध्या चालु असलेले हे काम कुणाच्या वरदहस्ताने चालु आहे याबद्दलही साशंकता व्यक्त होत आहे. नियमांची पायमल्ली मात्र धनिकांकडून होत असल्याचे चित्र आहे. दिवसाढवळ्या चालु असणार्या या बांधकामामुळे सर्वसामान्यांवर मात्र अन्याय होताना दिसत आहे. शासकीय यंत्रणाही स्थानिक गोरगरीबांच्या किरकोळ डागडुजीवर लगेच आक्षेप घेते मात्र डोळ्यासमोर चालु असणार्या या कामावर मात्र मेहेरबान होते याच गणीत काय ? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.नियमांना धाब्यावर बसवुन चाललेले हे काम तातडीने बंद करावे व संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी या शहरातील नागरीकांनी केली आहे. याच्यावर काय कारवाई होणार याचीच उत्सुकता समस्त पाचगणीकरांना लागुन राहिली आहे.
शासकीय यंत्रणेला हाताशी धरून पर्यटन स्थळावर अशा प्रकारे हेरीटेज वास्तु नेस्तनाबुत करण्याचा घाट काही धनदांडगे करीत असतील तर अशा बांधकामावर कठोर कारवाई व्हायला हवी. प्रशासन जर बघ्याची भुमिका घेत असेल तर पाचगणीचे वैभव लयाला जाण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे पाचगणीच्या सौंदर्याला जर अशा प्रकारे बट्टा लावला जात असेल तर अशा अधिकार्यंाविरोधात आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू.
– अविनाश भोसले,
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महाबळेश्वर तालुका