खंडाळा : खंडाळा तालुक्यात आता अनेक औद्योगिक प्रकल्प उभे राहिले आहेत. मात्र त्या प्रकल्पातील किसन वीर सहकारी खंडाळा साखर उद्योगाच्या कारखान्याशी येथील जनतेची भावनिक बांधिलकी आहे. त्यामुळेच शेतकरी सभासदांच्या स्वत:च्या मालकीची असणारी ही संस्था यशस्वीपणे वाटचाल करण्यासाठी शेतकर्यांनी पुढाकार घेणे आवश्यक असून प्रशासकीय पातळीवर या कारखान्यास सर्वोतोपरी सहकार्य करु, अशी ग्वाही राज्याचे साखर आयुक्त संभाजीराव कडू पाटील यांनी म्हावशी, ता. खंडाळा येथे बोलताना दिली.
किसन वीर खंडाळा सहकारी साखर उद्योगाच्या म्हावशी-खंडाळा येथील कारखान्याच्या दुसर्या गळीत हंगामाचा शुभारंभ कडू-पाटील यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून झाला. त्यावेळी ते बोलत होते. तत्पुर्वी खंडाळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र कदम व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. विभावरी कदम यांच्या हस्ते गव्हाणीचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यावेळी कडू पाटील बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, उपाध्यक्ष व्ही.जी.पवार, केतन भोसले, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव व दोन्ही कारखान्याचे संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.
कडू पाटील पुढे म्हणाले, सहकारी साखर कारखानदारीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांबरोबर सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती झाली आहे. मदनदादा भोसले यांनी आपल्या सहकार्यांसह प्रतिकुल परिस्थितीत खंडाळा तालुका साखर कारखान्याची उभारणी करुन तो यशस्वीरित्या चालवून किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने सहकारी साखर कारखानदारी पुढे नवीन आदर्श निर्माण केला आहे. आज 50 टक्के सहकारी तर 50 टक्के खाजगी कारखाने निर्माण झाले आहेत. दुसर्या पिकांच्या तुलनेत ऊस हे शाश्वत पिक असून शेतकर्यांना उसाला योग्य दर मिळण्याची खात्री निर्माण झाली आहे.
मदनदादा भोसले म्हणाले, अत्यंत अभ्यासू मितभाषी म्हणून परिचित असणारे संभाजीराव कडू-पाटील यांनी या पुढील कार्यकाळात साखर कारखान्यांचे केवळ दुवा न राहता दवा म्हणून काम करुन सहकारी कारखानदारी पुढील प्रश्नांकडे जाणीव पूर्वक पहावे. प्रतापराव भाऊंनी तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांचेकडून खंडाळा कारखाना उभारणीसाठी परवाना मिळवला. खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे सरांनी सर्व सामान्य शेतकर्यांच्या मालकीचा कारखान्याचे स्वप्न पाहीले. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही विविध अडचणींचा सामना करीत किसनवीर आणि खंडाळा यांच्या एकत्रित भागीदारीतून देशातील सहकारी तत्वावर खंडाळा येथे शेतकर्यांच्या मालकीचा साखर कारखाना उभारला हे देशातील पहिलेच उदाहरण होय. सहकारी चळवळीमुळे ग्रामिण जिवनाबरोबर शेतकरी व कामगार यांचे जिवनमान उंचविले आहे. विविध अडथळ्यांची शर्यत पार करीत आज दुसर्या गळीत हंगामाच्या यशस्वितेसाठी यंत्रणा सज्ज झाली असून शेतकर्यांनी आपल्या मालकीच्या कारखान्याला ऊस घालून हा हंगाम यशस्वी करावा असे आवाहन मदनदादा भोसले यांनी शेवटी केले.
खंडाळा साखर कारखान्याशी जनतेची भावनिक बांधिलकी : संभाजीराव कडू-पाटील
RELATED ARTICLES