सातारा : छत्रपती शिवरायांनी केलेल्या लढाया, तयार केलेले स्वराज्य हे त्यांनी बांधलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक गडावर जावून पाहिल्याशिवाय, अभ्यासल्याशिवाय, अनुभवण्यास येणार नाही. शिवभक्त दिव्यांगांनाही छत्रपती शिवरायांनी बांधलेले गडकोट पाहण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असते. हेच ओळखून औरंगाबाद येथील दिव्यांग असलेले शिवाजी गाडे- पाटील यांनी 2005 पासून राज्यातील अपंगांना सोबत घेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या दुर्गांवर दिव्यांगाना घेवून जाण्यास सुरुवात केली. त्यांनी एकटयाने 101 किल्यांवर भटकंती केली आहे. तर दिव्यांगासोबत 29 मोहिमा सर केल्या आहेत. राज्यातील दहा दिव्यांग दुर्ग संमेलनाला हजेरी लावणार असून दातेगड सर करणार आहेत.
सातारा जिह्यातील दातेगड येथे दुर्गसमेंलन होत आहे. या संमेलनाला दिव्यांग असलेले शिवप्रेमी शिवाजी गाडे – पाटील यांच्यासह त्यांचे दिव्यांग मित्र अमोल ढगे, अंजली प्रधान, सुनीता खरात, नरेंद्र खैरनार, तुकाराम जाधव यांच्यासह दहा जणांनी दातेगड सर करण्याचा निर्धार केला आहे. शिवाजी गाडे – पाटील हे एका पायाने दिव्यांग आहेत. त्यांना गडकोटाबाबत आकर्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकोटावर जाण्याचा निश्चय त्यांनी केला. परंतु दिव्यांगांना सोबत घेवून जाण्यास कोणी तयार होत नसते. त्यामुळे त्यांनी स्वतः दिव्यांगांची दुर्गभ्रमंती, अभ्यास सहलीचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त करत 2005 पासून सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी स्वतः 101 दुर्गांवर भ्रमंती केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकोटांची दिव्यांगांनी माहिती घेतली. तर दिव्यांग मित्रांसोबत देवगिरी, शिवनेरी, राजगड यासह विविध गडकोटावर 29 किल्ले सर केले आहेत. दातेगडावर दहा दिव्यांग येणार असल्याबाबत शिवाजी गाडे – पाटील यांना फोनवरुन विचारणा केली असता ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेचे राज्य निर्माण केले. गडकोट उभे केले. रयतेसाठी लढा दिला. त्या लढाया कशा लढल्या या आपण फक्त पुस्तकांतून वाचतो अन् अंगावर रोमांच उभे राहतात. विशाळगडापासून पन्हाळगडापर्यंत कसा प्रवास केला असेल ते पहायचे असेल तर आपल्याला विशाळगडावर गेले पाहिजे, पन्हाळगड पाहिला पाहिजे, तेथील वास्तूंमध्ये रमले पाहिजे. दिव्यांगाना घेवून मी दुर्गभ्रमंती करतो. सर्वसामान्य लोकांना दुर्गावर जाताना जेवढा वेळ जातो त्यापेक्षा जादा वेळ दिव्यांगाना लागतो. परंतु मनामध्ये जिद्द असते, उर्मी असते. त्यामुळे दिव्यांग बंधू तिथपर्यंत पोहचतात. मी तोरणा किल्याची मोहिम केली. तोरणा किल्ला पुर्णपणे सर करु शकलो नाही, परंतु त्याचा अनुभव वेगळा होता. दातेगडावर आमचे दहा मित्र जाणार असून तोही वेगळाच अनुभव असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारही ऐकण्यास आम्हाला मिळणार आहेत. हे आम्ही आमचे भाग्यच समजतो, असे त्यांनी सांगितले.
दुर्ग संमेलनात राज्यातील दहा दिव्यांग करणार दातेगड सर * शिवप्रेमी शिवाजी गाडे-पाटील सर करणार 102 वा दुर्ग, 29 मोहिंमांची पूर्ती * 2005 पासून राज्यभरातील गडकोट दिव्यांगांना घेवून करतात सर
RELATED ARTICLES