भुईंज : साखर उद्योग अनेक अडचणींचा सामना करीत मार्गक्रमण करीत असून ऊस टंचाईच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गळित हंगाम ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, वाहन मालक, तोडणी मजूर, हितचिंतक आणि कामगारांच्या विश्वासावर सांघिक प्रयत्नातून यशस्वी करू, असा विश्वास किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी व्यक्त केला. दरम्यान, यंदाच्या हंगामात किसन वीर उद्योगाकडे गाळपासाठी येणार्या ऊसाचा दर अन्य साखर कारखान्यांच्या निर्णयानंतर जाहीर केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या 46 व्या गळित हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ कारखान्याचे सभासद मोहन शंकर जायगुडे व सौ. उज्ज्वला मोहन जायगुडे (सिद्धनाथवाडी, वाई), मानसिंग निवृत्ती चव्हाण व सौ. इंदूबाई मानसिंग चव्हाण (कडेगाव, ता.वाई), सतिश शंकर जाधव व सौ. शैला सतिश जाधव (बावधन, ता. वाई), अनिल पांडुरंग वाघमळे व सौ. उज्ज्वला अनिल वाघमळे (आरळे, ता.सातारा), लक्ष्मण (प्रशांत) दशरथ संकपाळ व सौ. सारिका लक्ष्मण संकपाळ (ल्हासुर्णे, ता. कोरेगाव), विजय महादेव खताळ व सौ. वैशाली विजय खताळ (मरीआईचीवाडी, ता.खंडाळा), अशोक शांताराम विधाते व सौ. लता अशोक विधाते (भिवडी, ता. जावली) या उभयतांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, सातारा पंचायत समितीचे माजी उपसभापती साहेबराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
मदनदादा भोसले पुढे म्हणाले, साखरेचा उत्पादन खर्च, बाजारात साखरेला मिळणारा दर, अतिरिक्त साखर उत्पादन, अतिरिक्त ऊस, ऊस टंचाई, दुष्काळ अशा बदलत्या नैसर्गिक परिस्थितीचा आणि बाजारपेठेचा फटका साखर उद्योगासह ऊस उत्पादक शेतकर्यांना बसत असल्यामुळे साखर उद्योगाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास अडचणी येत आहेत. त्याचबरोबर गतवर्षीच्या दुष्काळामुळे ऊस लागवडीत घट झाल्यामुळे यंदाच्या हंगामात ऊस टंचाईचा प्रश्न निर्माण झालेला असून कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकर्यांनी मातृसंस्थेशी प्रामाणिक राहून नैतिक जबाबदारीतून आपला संपूर्ण ऊस किसन वीर, प्रतापगड आणि खंडाळा कारखान्याला द्यावा. राज्य शासनाने एक डिसेंबरला गळित हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तोडणी मजूरांचे स्थलांतर, सीमा भागातील कारखान्यांकडून ऊसाची पळवा-पळवी असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. या संभाव्य परिस्थितीचा विचार करून येत्या पंधरा नोव्हेंबरला तिनही कारखाने सुरू करण्याच्यादृष्टीने व्यवस्थापनाने सर्व तयारी केलेली आहे. ऊस उत्पादक सभासद शेतकर्यांबरोबरच कारखान्याचे कामगारही साखर उद्योगाच्या सद्यपरिस्थितीची जाणीव व भान ठेवणारे असून कामगारांनाही यंदा नियमाप्रमाणे बोनस देण्याची व्यवस्था केली जाईल, असेही ते म्हणाले.