सातारा : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणार्या कोपर्डी प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्या नंतर सातार्यात या निकालाचे जोरदार स्वागत झाले. पोवईनाक्यावरील ऐतिहासिक शिवतीर्थावर सकल मराठा समाजाच्यावतीने कॅण्डल मार्चद्वारे कोपर्डीच्या भगिनीला श्रद्धांजली वाहण्यात आली. न्यायालयाच्या निकालामुळे आज खर्या अर्थाने कोपर्डीच्या ताईला न्याय मिळाला. मात्र, त्या तीन नराधमांना फासावर लटकताना पहायचे आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त करत सकल सातारा मराठा समाज बांधवांनी यापुढील लढाईसाठीही एकसंघ राहण्याचा निर्धार केला.
सातार्यातील पोवई नाक्यावर कोपर्डीच्या भगिनीला श्रध्दांजली वाहण्यासाठी बुधवारी सायंकाळी कॅण्डल मार्चचे आयोजन केले होते. प्रारंभी मराठा भगिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी शरद काटकर म्हणाले, कोपर्डीच्या नराधमांना फाशी मिळावी, अशी सर्वसामान्यांची इच्छा होती. न्यायदेवतेने जनभावना ओळखून त्या नराधमांना फाशी दिली. खरं तर हा मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय आहे. परंतु मराठा बांधवांना आरक्षण मिळावे, ही आपली प्रमुख मागणी आहे. त्यासाठी आपला लढा सुरुच राहणार आहे.
हरीष पाटणे म्हणाले, कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळावा, यासाठी मराठा बांधवांनी 58 मोर्चे काढले. आपल्या भगिनीसाठी मराठा बांधव रस्यावर उतरले. न्यायदेवतने जनभावनांचा आदर करत कोपर्डीच्या नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली. मात्र, महाराष्ट्राच्या जनतेला या तिन्ही नराधमांना लवकरात लवकर फासावर लटकवताना पहायचे आहे. इथून पुढेही आपली लढाई सुरुच राहणार असून मराठा बांधवांनी असेच एकसंघ राहण्याचे आवाहन पाटणे यांनी केले.
यावेळी एक मराठा, लाख मराठा, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय, मराठा एकजुटीचा विजय असो, आदि घोषणांनी पोवई नाका परिसर दणाणून गेला.