9 प्रभागांमधील अर्ज माघारी घेण्याची मुदत वाढवली
कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी 9 प्रभागातील उमेदवारांविषयी न्यायालयात अपिले दाखल झाली होती, त्याचे निर्णय गुरुवारी आणि शुक्रवारी झाले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी 9 प्रभागांमधील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत चार दिवसांनी वाढवली आहे. उर्वरित 8 प्रभागांमधील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आज संपली. एकाही उमेदवाराने माघार घेतलेली नाही. शनिवारी सकाळी 11 वाजता या प्रभागांमधील चिन्ह वाटप होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी पत्रकारांना दिली.
नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेदरम्यान दोन उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविल्याने, त्यांनी जिल्हा न्यायालयात अपिल दाखल केले होते. त्यावर गुरुवारी न्यायालयाने निकाल दिला आहे. त्याचबरोबर 7 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरविल्याने त्या विरोधात एका उमेदवाराने जिल्हा न्यायालयात अपिल दाखल केले होते, त्यावर शुक्रवारी न्यायालयाने निकाल दिला आहे.
महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम-1966 मधील कलम 17 मधील तरतुदीनुसार प्रभाग क्र. 3, 4, 7, 8, 11, 12, 14, 15 व 16 या नऊ प्रभागांमधील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत दि. 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. त्यानंतर दि. 16 रोजी या प्रभागातील चिन्ह वाटप सकाळी 11 वाजता केले जाणार आहे. उर्वरित प्रभाग क्र. 1, 2, 5, 6, 9, 10, 13 व 17 या आठ प्रभागांमधील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आज संपली. शनिवार दि. 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता या प्रभागातील उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार असल्याचे खराडे यांनी सांगितले