7 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविणारा निवडणूक निर्णय अधिकारी रडावर
कोरेगाव : शहरात ग्रामपंचायत असताना दोन महिला सरपंचांच्या काळात झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी त्या कार्यकालात सदस्य असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या 7 उमेदवारांनी नगरपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल केले असून, त्यांचे अर्ज अपात्र ठरवावेत, अशी मागणी भाजपच्यावतीने हरकतीद्वारे करण्यात आली होती, मात्र ती फेटाळत निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी अर्ज पात्र ठरविले होते. खराडे यांच्या या निर्णयाच्या विरोधात भाजपने शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयात अपिल दाखल केले आहे. शनिवारी या अपिलावर प्रथम सुनावणी होणार आहे.
याबाबत अपिल दाखल करणारे भाजपचे उमेदवार विठ्ठल बर्गे, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. पुरुषोत्तम बारसावडे, अॅड. अमोल भुतकर यांनी सांगितले की, तत्कालीन कोरेगाव ग्रामपंचायतीमध्ये सन 2010 ते 2015 व 2015 ते 2016 या कालावधीत गैरव्यवहार झाले असून, त्याबाबत रितसर तक्रार जिल्हा परिषदेकडे करण्यात आलेली होती.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या गैरव्यवहाराची आपआपल्या पातळीवर चौकशी सुरु केलेली आहे. ग्रामपंचायतीच्या या दोन कार्यकालामध्ये असलेल्या काही सदस्यांनी कोरेगावात नगरपंचायत झाल्यानंतर जाहीर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे बुधवार दि. 2 नोव्हेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी हिम्मत खराडे यांनी उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेस सुरुवात केली होती. त्यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष व प्रभाग क्र. 13 मधील उमेदवार विठ्ठल बर्गे यांनी ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणाची चौकशी सुरु असून, त्यावेळी सदस्य असलेल्या सौ. मंदा किशोर बर्गे (प्रभाग क्र. 3), महेश साहेबराव बर्गे (प्रभाग क्र.4), युवराज विश्वासराव बर्गे (प्रभाग क्र. 8), श्रीमती प्रतिभा शिवाजीराव बर्गे (प्रभाग क्र. 7), संजय लक्ष्मण पिसाळ (प्रभाग क्र. 11), संतोष विलास चिनके (प्रभाग क्र. 15) व डॉ. मनिषा गणेश होळ (प्रभाग क्र. 16) यांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ते शासकीय थकबाकीदार असून, त्यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी केली होती. त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे त्यांनी सादर केली होती. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांच्यापुढे याबाबत सुनावणी झाली.
आम्ही युक्तिवाद करत सात जणांचे अर्ज अवैध ठरविण्याची मागणी केली होती, मात्र खराडे यांनी आमची हरकत फेटाळत सातही उमेदवारांचे अर्ज वैध ठरविले होते, असे अॅड. बारसावडे व अॅड. भुतकर यांनी सांगितले.
निवडणूक निर्णय अधिकारी हिम्मत खराडे यांच्या आदेशांची नक्कल मिळाल्यानंतर आम्ही जिल्हा न्यायालयात शुक्रवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांपुढे अपिल (क्र. 1963 ते 1969) दाखल केले आहे. या अपिलावर आता शनिवार (दि. 5) रोजी सुनावणी होणार आहे