सातारा : पैसे देवून कुणाला आत्मविश्वास विकत घेता येत नाही, तो आत्मविश्वास स्वत:ने स्वत:जवळ ठेवायला हवा होता. कर्मवीर भाऊराव पाटील व सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील या दांम्पत्याने प्रतिकुल परिस्थितीवर मात करून आत्मविश्वास वाढविल्यानेच रयत संस्थेचा विस्तार वाढला, असे प्रतिपादन इन्फोसिस फौंडेशनच्या चेअरमन डॉ. सुधा मुर्ती यांनी केली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात रयत माऊली सौ लक्ष्मीबाई पाटील राष्ट्रीय पुरस्कार इन्फोसिस फौंडेशनच्या चेअरमन डॉ. सुधा मुर्ती यांना प्रदान करण्यात आला. यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी आ. डॉ. पतंगराव कदम होते. तर प्रमुख म्हणून विधान सभेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, रयतचे माजी चेअरमन प्रा. डॉ. एन. डी. पाटील, सचिव गणेश ठाकुर, सह सचिव डी. डी. पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. सुधा मूर्ती म्हणाल्या, रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य हिमालयाएवढे आहे ते कोठे आणि माझे कार्य कोठे डोंगराएवढे आहे. माणसाच्या जीवनात कुणाला गर्व नसावा, पण गर्व असावा तो आपल्या मातीचा व राष्ट्राचा छ. शिवाजी महाराज यांच्या पद्स्पर्शाने पुनित झालेला हा सातारा जिल्हा आहे. या जिल्ह्यात अनेक थोर रत्ने होवून गेलीत त्याचा आदर्श भावी पिढीने जपायला हवा. मला देवकी पाहिजे, कृष्ण पाहिजे तसाच महाराष्ट्र व कर्नाटक हवा. मला एवढा मोठा पुरस्कार मिळाला आहे तो अतिउच्च आहे असे मी मानते. इन्फोसिस फौऊंडेशनच्या माध्यमातून माझे समाजकार्य सुरु आहे. विशेषत: समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी गाव तेथे शाळा आणि शाळा तेथे ग्रंथालय हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संगणक शिक्षण आरोग्य विषयक कार्य हजारो अनाथालयांची उभारणी, जलसंधारणाच्या विविध योजना, स्वच्छता गृहाची निर्मिती सैनिकांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत, महिला वसतिगृहे, पूरग्रस्तांसाठी मदत विशेष बाब म्हणून 30 हजार शौचालयाची उभारणी केल्याचे समाधान मला झाले आहे असे डॉ. सुधा मूर्ती यांनी स्पष्ट केले.
आपल्या प्रास्ताविक भाषणात गणेश ठाकूर म्हणाले, आज रयत संस्थेचा विस्तार मोठा झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात रयत संस्थेला महत्व आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्याकाळी किर्लोस्कर, कूपरमध्ये विक्रीकर अधिकारी म्हणून काम केले होते. पत्नी लक्ष्मीबाई यांच्या अंगावरील दोनशे तोळे सोने मोडून गाव तेथे शाळा काढली. कमवा व शिका योजनेतून मुलांना आर्थिक स्वावलंबन शिकविले.
अनिल पाटील म्हणाले, डॉ. सुधा मूर्तीचे कार्य फार मोठे आहे. त्यांच्या कार्याला शोभेल म्हणूनच त्यांची सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कारासाठी उचित निवड केली. नारायण मूर्ती यांना डॉ. सुधा मूर्ती यांनी 10 हजाराची मदत केल्यामुळेच इन्फोसिस कंपनी उभी राहिली.
आ. डॉ. पतंगराव कदम म्हणाले, नारायण मूर्ती माझ्या भारती विद्यापीठात आले तेव्हा रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील राष्ट्रीय पुरस्कार डॉ. सुधा मूर्ती यांना आम्ही देत आहोत त्याचा स्विकार करावा म्हणून सांगितले होते. लगेच त्यांनी होकारार्थी शब्द दिला आणि प्रत्यक्षात आज या पुरस्काराचे वितरण झाल्याचे मला समाधान वाटते. नारायण मूर्ती यांना कारखाना सुरु करण्यासाठी हिंजवडी येथे चार एक जमीन दिली. नवीन कंपन्या स्थिर होतील या भावनेतून मी सहकार्य केले होते. सत्ता, संपत्ती आज लोक मिळवत आहेत, पण आपुलकी कमी होत आहे. गरीब हा जादा गरीबच होत चालला आहे. तर श्रीमंत हा श्रीमंतच होत आहे ही तफावत दूर व्हायला हवी. सन 1968 मध्ये विनोबांना पत्र लिहून त्यांच्या कंपनीसाठी सहकार्य केले. आज डॉ. सुधा मूर्तीचा आदर्श अनेक धनदांडग्याची घ्यायला हवा. प्रारंभी डॉ. सुधा मूर्ती यांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्राचे वाचन प्रा. शिवलिंग मेनकुदळे यांनी केली. तसेच मान्यवरांच्या हस्ते डॉ. सुधा मूर्ती यांना रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील राष्ट्रीय पुरस्कारामध्ये 2 लाख 50 हजाराचा धनादेश, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीपळ, पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. सहसचिव डी. डी. पाटील यांनी आभार मानले.