सातारा : मारुती जानकर यांनी रासपाच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करुन संपत्ती जमा केली. त्यांना पक्षातून बाजूला केल्यानंतर त्यांनी रासपाचे नेते महादेव जानकर यांच्याबद्दल अपशब्द वापरुन सवंग लोकप्रियतेसाठी त्यांची बदनामी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, आपली उंची पाहून वक्तव्य करावीत अन्यथा यापुढे मारुती जानकर यांनी त्यांच्याबद्दल काही बदनामकारक वक्तव्य केल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा रासपाचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस प्रकाश खरात यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी डॉ. रमाकांत साठे, बाळासाहेब आटपाटकर, शिवाजी माने व योगेश नरोटे उपस्थित होते.
खरात म्हणाले, रासपचे अध्यक्ष व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर पक्षाच्या माध्यमातून धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत शासन पातळीवर प्रयत्न करत आहेत. मारुती जानकर हा काही महिन्यांपर्यंत रासपात काम करत होता. त्याने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर रयत शिक्षण संस्थेच्या आवारात बुक्का उधळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महादेव जानकर यांनी त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. म्हणून मारुती जानकर महादेव जानकरांविषयी अपशब्द वापरत आहे. यापुढे त्याने महादेव जानकर व रासपाची बदनामी केली तर ती खपून घेतली जाणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल. वेळप्रसंगी अशा प्रवृत्तीला ठोसा देण्यासही मागेपुढे पाहणार नाही. महादेव जानकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. शासन पातळीवर त्यावर प्रयत्न सुरु आहेत. लवकरच धनगर समाजास आरक्षण मिळेल, अशी आशा असून तसा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे.