सातारा : कोपर्डीच्या दुर्दैवी घटनेनंतर मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर आपल्या न्याय हक्कांसाठी उतरत आहेत. सातार्यात 3 ऑक्टोबर रोजी होणारा मराठा क्रांती मोर्चा हा मराठयांची राजधानी असलेल्या सातार्याला साजेसा असेल. महिला मोर्च्याच्या सुरुवातीला असणार असल्यामुळे जिल्ह्यातून महिलांनी मोठया संख्येने उपस्थिती लावावी, असे आवाहन श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले यांनी केले. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या महिला, जिल्हा परिषदे आणि पंचायत समितीच्या सदस्या, नगरसेविका, सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या यांची बैठक जलमंदिर पलेस येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी आयोजकांनी मोर्च्याच्या मार्गासह नियोजनाची संपूर्ण माहिती सुरुवातीला महिलांना दिली.
यावेळी बोलताना दमयंतीराजे म्हणाल्या, कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाज मोठया प्रमाणात जिल्हा निहाय मूक मोर्चाद्वारे आपली ताकद दाखवत असून अत्यंत शिस्तबद्ध शांतेत हे मूक मोर्चे निघत आहेत. छत्रपतींची राजधानी अशी सातारची ओळख आहे. त्याला साजेसा मोर्चा 3 ऑक्टोबरला भव्यदिव्य स्वरुपात पाहायला मिळेल. हा मोर्चा कोणाच्याही विरोधात नसून संपूर्ण महाराष्ट्रातून महिला, अबाल वृद्धांसह युवा वर्ग मोठ्या प्रमाणात मोर्च्यात सहभागी होत आहे. महिलांवरील होणारे अत्याचार हा गंभीर प्रश्न असून हीच वेळ आहे महिलांनी या 3 ऑक्टोबरच्या मोर्च्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपली ताकद दाखवून देण्याची. राजकारण विरहित आपल्या मागण्या मांडताना निघणारे मूक मोर्चे हे शांततेच्या मार्गाने संविधानिकतेचा सर्वोत्कृष्ट नमुना आहेत. स्त्री-पुरुष समानतेच्या 21 व्या शतकात महिला कोठेही पुरुषापेक्षा कमी नाहीत; तर आजची महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात ठाम उभी आहे. 3 ऑक्टोबरला होणार एल्गार हा एक मराठा लाख मराठा या स्लोगन प्रमाणे राजधानीला शोभेसा असणार आहे, त्यात मोठ्या प्रमाणात भगिनींनी सहभागी होऊन मराठा क्रांतीचे साक्षीदार व्हावे, यासाठी आजची बैठक असल्याचे सौ. छ. दमयंतीराजेंनी स्पष्ट केले. यावेळी महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणा-या राजा राम मोहन रॉय यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. नवरात्रीचे दिवसांमध्ये 3 ऑक्टोबरला मोर्चा होणार असून यावेळी बहुतांश महिला उपवास पकडतात. त्यामुळे सोबत खाण्याचे पदार्थ आणि पाणी महिलांनी सोबत घ्यावे. ते रस्त्यावर कोठे ही टाकून कचरा न करता स्वच्छता राखणे आपली जबाबदारी असणार आहे. नियोजन समिती मोर्चासाठी उत्कृष्ठ नियोजन करीत असून काही अडचण असल्यास त्यांच्याशी महिलांनी संपर्क साधावा. यावेळी तालुका निहाय महिलांचे ग्रुप बनवत एकमेकाला सहकार्य करीत शांततेच्या मार्गाने मोर्च्यात महिलांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री. छ. सौ. दमयंतीराजेंनी केले.