सातारा : सातार्यातील कल्याणी शाळेसमोर सोमवारी रात्री युवकाला मारहाण, दमदाटी, शिवीगाळ करुन त्याच्या दुचाकीवरील स्टीकर फाडून नुकसान केल्याप्रकरणी प्रतापसिंहनगर येथील लल्लन जाधवसह त्याच्या पाच सहकार्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोवई नाक्यासह शहर पोलिस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सत्यम संजय मोरे (वय 20, रा. त्रिपुटी खिंडीजवळ) अशोक आनंद वाघ (वय 19, रा. इरिगेशन कॉलनी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून अजय उर्फ लल्लन दत्तात्रय जाधव (रा. प्रतापससिंहनगर), शुभम उर्फ जगीरा कांबळे (प्रतापसिंहनगर), योगेश नायकवडे (रा.वनवासवाडी), संकेत माने यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणी आशितोष अनिल देशमुख (रा.गोडोली) या युवकाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत घटनास्थळावरुन व शहर पोलिस ठाण्यातून माहिती मिळाली आहे. सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास लल्लन याने गोंधळ घालत तक्रारदाराची दुचाकी अडवली. जुन्या कारणाच्या कारणावरुन धक्काबुक्की करुन दमदाटी, शिवीगाळ केली. तसेच संशयितांनी दुचाकीवरील स्टीकर फाडले. या घटनेनंतर त्याने पुन्हा तसाच प्रकार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना परिसरातील नागरिकांनी पाहिल्यानंतर लल्लनला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने घटनास्थळावरुन पलायन केले.
लल्लन याने केलेल्या कृत्याची माहिती पाहता पाहता पसरताच युवकांमध्ये संतापाची लाट उसळली. पोलिसांना घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस ठाण्यात युवक आल्यानंतर त्याठिकाणी पाहता पाहता गर्दी वाढू लागली. पोलिसांनी तत्काळ संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी पोलिस ठाण्यासमोर करण्यात आली. कारवाईच्या मागणीसाठी युवकांचा परिसरात ओघ वाढू लागल्यानंतर पोनि बी.आर.पाटील यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. घटनेची माहिती घेवून तक्रारदाराची निश्चित तक्रार घेईल जाईल, असे आवाहन केल्यानंतर जमाव शांत झाला.
रात्री उशीरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, घटनेची गांभीर्य ओळखून पोलिसांनी लल्लनसह त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री उशीरापर्यंत मात्र तो पोलिसांना आढळून आला नाही.