सातारा : राज्यभर मराठा समाज विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे. सर्वच ठिकाणी शांततेच्या मार्गांनी मोर्चे निघत आहेत. सातारा जिल्ह्यातून 3 ऑक्टोबरला मराठा मुक मोर्चाच्यावतीने विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. काढण्यात येणार्या मोर्च्याच्या अनुषंगाने पोलीस दरलाकडून मोर्चाला कुठेही गालबोट लागू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पोलीसांनी समज बजावल्या आहेत. तसेच मोर्चाला लाखोच्या संखेनी होणारी गर्दी पहाता वाहतुकीची कोंडी होवू नये यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने वाहनांसाठी शहराच्या चारी बाजुनी पार्किंगचे नियोजन केले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मराठा मोर्चाच्या नियोजनासाठी माहिती देताना जिल्हा पोलीस अधिक्षक पाटील म्हणाले, साता-यात 3 ऑक्टोबरला निघणार्या मराठा क्रांती मोर्च्यासाठी कराड, रहिमतपूर, कोरेगाव, खंडाळा, वाई, महाबळेश्वर, मेढा आणि परळी भागासह पुण्याकडून येणा-या वाहनांसाठी त्या-त्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनांमधून येणा-या लोकांना शहरात येण्यासाठी गैरसोय होऊ नये, जास्त चालावे लागू नये. याअनुषंगाने पोलीस दलाच्यावतीने सर्वे पूर्ण केल्यानंतर वाहनांच्या पार्किंगसाठी जागा फिक्स करण्यात आल्या आहेत. मोर्च्याचा संपूर्ण मार्ग 5.20 किमीचा असून जिल्हा परिषद मैदान, एसटी स्तंड मार्गे गणपतराव तपासे मार्ग पुढे राधिका थिएटर, समर्थ थिएटर पासून मोती चौक, राजपथ मार्गे नगर परिषद आणि पोवई नका असा असणार आहे. मोर्च्यात सुरुवातील युवती, त्यांच्या मागे महिला आणि त्यानंतर युवक आणि पुरुष असे नियोजन समितीच्यावतीने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अन्य जिल्ह्यांमध्ये झालेले मोर्चे पाहता सकाळी लवकर मोर्चेकरी शहरात यायला सुरुवात होत आहे. त्याअनुषंगाने 1 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जाहीर करण्यात येणार आहे. मोर्च्या शांतेत पार पडण्यासाठी 300 अधिकारी, 2500 पोलीस, 700 होमगार्ड आणि 3000 स्वयंसेवक असणार आहेत. या व्यतिरिक्त संपूर्ण जिल्ह्यात आणि महामार्गावर वेगळा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरात वाहतुकीचे नेटके नियोजन करण्यात आले असून अत्यावश्यक सेवेसाठी मोती चौक ते क्रां. नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय हा मार्ग मोर्च्याच्या अखेरीपर्यंत खुले ठेवण्यात येणार आहे. यासाठी शहर आणि परिसरातील विविध 12 ठिकाणी डॉक्टरसह अद्ययावत अॅम्ब्यूलन्स उपलब्ध असणार आहेत. या व्यतिरिक्त कोणताही अनुचित प्रकार मोर्च्यात घडू नये म्हणून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोणत्याही क्षणी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शेवटी केले. यावेळी मराठा क्रांती मोर्च्याच्या आयोजक समितीचे सदस्य उपस्थित होते.