सातारा : मराठा समाजाचे मराठा क्रांती मूक मोर्चे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सुरु आहेत. अजूनही काही जिल्हे बाकी असून यानंतरच महाराष्ट्राचा एकत्रित मोर्चा मुंबईत निघणार आहे. यानंतरच मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या काय आहेत याची माहिती सरकार म्हणून आपल्यापुढे येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणहून कोणतेही वक्तव्य करण्याची घाई करू नये. आम्ही जे आपल्याला निवेदन देणार आहे, त्यामध्ये आपल्याला होय अथवा नाही एवढेच उत्तर द्यावे लागणार आहे. आपण जरा धीर धरावा आणि थोडे दमानेही घ्यावे, असा उपरोधिक सल्ला श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
मराठा क्रांती मूक मोर्चाचा मुख्य मोर्चा दिपावलीपूर्वी अथवा त्याच्यानंतर मुंबईत होणार आहे. त्यासाठी दि. 30 रोजी सकाळी अकरा वाजता दादर (मुंबई) येथील शिवाजी मंदिरात बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील संयोजन समितीचे पदाधिकारी सहभागी होणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी डॉ. पाटणकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. सातारा येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत डॉ. पाटणकर यांनी मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सध्या सुरु असलेल्या चर्चा यावर सविस्तर भाष्य केले. त्यांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेलाही टोले मारले.
नुकत्याच नवी मुंबई येथे झालेल्या माथाडी कामगार मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी भूमिका मांडून मराठा क्रांती मूक मोर्चाला बगल देण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा संदर्भ देवून डॉ. पाटणकर यांनी मुख्यमंत्र्यांना मौलिक सल्लाही दिला. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या मोर्चाचे निवेदन ठरविण्याच्या अनुषंगाने दि. 30 ऑक्टोबर रोजी मुंबईतील बैठकीत चर्चा होणार आहे. सकल मराठा समाजाची जी काही दु:खे आहेत ते तो आता शांततेच्या मार्गाने सांगत आहे. ते फक्त ऐकण्याची तयारी आपण ठेवावी. मुंबईत ज्यावेळी महाराष्ट्राचा मोर्चा निघेल त्यानंतर आपल्यासमोर मागण्या येणारच आहेत. त्या जर आम्ही आमची भूमिका आपल्यासमोर स्पष्ट करू. सरकारने किती वेळेत काय करावे, याचाही निर्णत तुम्हाला तत्काळ घ्यावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही अथवा आपल्या मंत्री प्रतिनिधींच्या मार्फत कोणतीही घोषणा करू नका. तुम्ही थोडा धीरही धरा आणि दमानंही घ्या, असा सल्लाही त्यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना दिला.
डॉ. पाटणकर म्हणाले, महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यात क्रांती मोर्चे झाले तेथे सकल मराठा समाजाने उत्सफूर्त प्रतिसाद नोदंविला आहे. प्रत्येक मोर्चात झालेल्या मागण्यांपैकी कोपर्डी अत्याचार, मराठा आरक्षण आणि अॅट्रॉसिटी कायदा यावरच सर्वाधिक भर आहे. मात्र, अजूनही मराठा समाजाचे असंख्य प्रश्न आहे. ते प्रश्न नेमके काय आहेत आणि ते सोडविण्यासाठी सरकार म्हणून असणारी भूमिका याची माहिती आम्ही मुंबईतील मोर्चानंतरच स्पष्ट होणार आहे. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, पुनर्वसनाचे प्रश्न, जमीन, शाश्वत विकास असे कितीतरी प्रश्न आहेत की ते मराठा समाजाला भेडसावत आहेत. मुख्यमंत्री त्यांच्या बाजूने प्रयत्न करत आहेत. त्यावरही आमची चर्चा सुरु आहे आणि मुंबईतील बैठकीत त्याचबरोबर मुंबईतील मोर्चा झाल्यानंतर आम्ही बोलणारच आहे. आमचे जे काय आहे ते आम्ही तुम्हाला जरुर सांगू. त्यामुळे तुम्ही सध्यातरी यावर काही बोलू नका आणि तुमच्याकडून जी काही कार्यवाही सुरु आहे ती देखील थांबवा. जेथे मोर्चा आहे तेथे आपले मंत्री असलेले प्रतिनिधी तुम्ही पाठवू नका. सकल मराठा समाजाचे सुरु असलेले मोर्चे स्वयंस्फूर्तीने होत आहेत. त्यामध्ये आपण खोडा घालू नये.
तुम्ही आमचे नव्हे हे आता त्यांना सांगा..!
मराठा क्रांती मोर्चाला गालबोट लागावे म्हणून काहीजण प्रयत्न करत आहेत. याचवेळी त्यांना एका दैनिकातील व्यंगचित्राचा दाखला देत मराठा समाजामध्ये संतापाची लाट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे, असे विचारले असता त्यांनी मराठा समाजाने आपल्या रागावर नियंत्रण राखावे. आपले शत्रू आपण ओळखले आहेत. त्यामुळे आपण हिंसाचारी वागू नये. आपल्यावर ठपका राहावा म्हणून त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आता आपले कोण हे ओळखणे आवश्यक आहे. तुम्ही ही आता जबाबदारी ओळखा आणि त्यांच्याजवळ जावूच नका. त्यांनी आपल्या मोर्चाला गालबोट लागावे म्हणून जे काही सुरु केले आहे त्यावर आपण शांततेच्या मार्गाने उत्तर देवू. त्यांनी आपला अस्त्र म्हणून वापर केला आता आपण त्यांच्याजवळ जायचेच नाही. एवढे मनी बाळगा. सकल मराठा समाज पोटतिडकीने रस्त्यावर येत असताना त्याची जर कोणी टर उडवत असेलतर त्यांच्यासाठी आपण आपले आयुष्य खर्ची घालण्यात काय अर्थ आहे. त्यामुळे त्यांना आता स्पष्टपणे सांगा.. आमचे आम्हाला आमच्याच मार्गान जावू द्या. तुम्ही आमचे नाहीत हे तुम्ही स्पष्ट केले आहे. एवढे उत्तर त्यांना पुरेसे आहे, असेही डॉ. भारत पाटणकर यांनी सकल मराठा समाजाच्यावतीने ठणकावून सांगितले.
‘होय’ अथवा ‘नाही’ एवढेच आता बोला..!
मराठा समाज आता अनुभवातून शहाणा होत आहे. चांगले काय आणि वाईट काय हे या पिढीला आता चांगले उमजून आले आहे. आम्ही आमचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईतील मोर्चानंतर आपल्यासमोर मागण्या येणारच आहेत. आमच्या मोर्चाच्या अनुषंगाने सरकारमधील घटक काहीतरी फेकत असतात. त्यामुळे आम्ही त्यांना आता तसे बोलूही देणार नाही आणि वागूही देणार नाही. त्यांनी काय बोलायचे हे आता ठरवूनच आमच्याशी बसावे लागणार आहे. किती वेळात करणार याचेही स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. आता आम्हाला सरकारने फक्त होय अथवा नाही या दोन शब्दातच भाष्य करायचे आहे.