महाबळेश्वर: महाबळेश्वर शहरातील नागरिकांच्या भावना धुडकावून वन विभागाने वन व्यवस्थापन महासमितीच्या माध्यमातून वेण्णा लेक येथे उपद्रव व प्रवेश शुल्क या नावाखाली टोल वसूली सुरु केल्याने महाबळेश्वरातील नागरिक संतप्त. महाबळेश्वर बाजारपेठ बंद करुन नागरिकांनी मोर्चा काढला व तहसिलदार रमेश शेंडगे व उपविभागीय अधिकारी दीपक हुंबरे यांना या टोल विरोधात निवेदन देवून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
गेली काही दिवसांपासून वन विभाग व महाबळेश्वर पालिकेचा टोल एकत्रिकरण वाद सुरु आहे. जिल्हाधिकारी, पालकमंत्री, विधानसभा सभापती यांच्याकडे बैठका होऊन देखील ठोस निर्णय निश्चित न झाल्याने वन विभागाने पोलिस संरक्षणात आज येथील वेण्णा लेक येथे टोल वसूलीस सुरुवात केली. वन विभागाने विविध पॅाईंटवर वन व्यवस्थापन समिती स्थापन करुन सुरुवातीला तिथे प्रत्येक वाहनाला 10 रुपयांप्रमाणे टोल वसूल करु लागली. पर्यटकांना त्याची सवय झाल्यानंतर त्यांनी माणसी 10 रुपये वसूल करण्यास सुरुवात केली व या पॅाईंटची देखभाल सुरु केली. त्यामुळे अनेक पॅाईंटवर टोल वसूली करताना सर्वच पॅाईंटवर वाहनांची रांग लागून अनेक वेळा सर्वच पॅाईंटवर पर्यटकांना विनाकारण वाहतूकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे अनेक जण एकाच ठिकाणी वसूली व्हावी असा आग्रह धरत होते. त्याप्रमाणे वन विभाग व नगरपालिकेने एकाच ठिकाणी टोल वसूल करावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न झाले परंतू या बैठकीमध्ये कोणी किती पैसे घ्यायचे यावरुन एकमत झाले नाही. त्यामुळे वन विभागाने वेण्णा लेकवर आपला स्वतंत्र टोल बूथ आज सकाळी लावून त्याचे उद्घाटन उप वनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्या उपस्थितीत टोल वसूली सुरु केली. यावेळी कोणतिही अनुसूचित घटना घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तितक्याच प्रमाणात वन विभागाचे कर्मचारी वडूज, वाई, पाटण, खंडाळा या भागातून आले होते. त्यामळे या परिसराला छावणीचे स्वरुप आले होते.ही बातमी महाबळेश्वर बाजारपेठेत पसरल्याने शहरातून तीव्र संताप व्यक्त केला जावू लागला. सोशल मिडीयावर महाबळेश्वर येथिल राम मंदिर येथे बैठकीचे मेसेज फिरु लागले. दुपारी साडे बारा वाजता मोठ्या संख्येने राम मंदिर येथे नागरिकांची बैठक झाली. या बैठकीत महाबळेश्वर बाजारपेठ बंद करुन वन विभागाच्या टोल विरोधात आपल्या तीव्र भावना पोहोचविण्यासाठी महाबळेश्वर पोलिस स्टेशन येथे उपविभागीय अधिकारी दिपक हुंबरे यांना निवेदन देवून नागरिकांनी तहसिलदार येथे जावून तहसिलदार रमेश शेंडगे यांना निवेदन दिले. निवेदनामध्ये वन विभागाने जबरदस्तीने सुरु केलेल्या वेण्णा लेक येथिल टोल विरोधात संतप्त प्तिक्रिया व्यक्त केल्या व हा टोल थांबविला नाही तर मोठे आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला. या मोर्चामध्ये शहरातून नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णिवाल यांच्यासह नगरसेवक संदिप साळुंखे, कुमार शिंदे, संतोष(आबा) शिंदे, अफझल सुतार, अर्बन बँकेचे संचालक समिर सुतार, अतूल सलागरे,माजी नगरसेवक रविंद्र कुंभारदरे, सलिम बागवान, सूर्यकांत शिंदे, सुनिल शिंदे, विशाल तोष्णिवाल, भा.ज.प. शहराध्यक्ष सनी उगले, टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष रविंद्र हिरवे, चंद्रकांत बावळेकर, घोडा संघटनेचे अध्यक्ष जावेद खारकंडे, प्रशांत आखाडे, तौफिक पटवेकर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, वन विभागाच्या वन व्यवस्थापन महासमितीच्या टोल वसूली नाक्याचे उध्घाटन वन उपसंरक्षक अनिल अंजनकर, उपविभागीय अधिकारी दिपक हुंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाबळेश्वर वन विभागाचे वन संरक्षक सूर्यकांत कुलकर्णी, संजय मारणे, खंडाळा येथिल शिंदे, पाटण येथिल काळे, वाई येथिल बुधनवार, वडूज चे गजानन चव्हाण व यावेळी प्रतापगड, अवकाळी, क्षेत्र महाबळेश्वर, भेकवली, गुरेघर या वन व्यवस्थापन समितीचे सदस्य व या गावातील स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
दरम्यान, वेण्णा लेक येथे नव्याने सुरु होणार्या टोल नाक्यावरुन शहरातून कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी वन विभागाने मोठा फोजफाटा जमा केला होता. वन विभागाचे महाबळेश्वर, वाई, खंडाळा, पाटण येथून कर्मचारी मागवून तैणात केला होते. तर पोलिस बंदोबस्त देखिल मोठ्या प्रमाणात मागविण्यात आला होता. उपविभागीय अधिकारी दिपक हुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर पोलिस निरिक्षक राजेंद्रकुमार राजमाने, वाईचे पोलिस निरिक्षक विनायक वेताळ, पाचगणीचे पोलिस निरिक्षक नारायण पवार यांच्यासह महाबळेश्वर येथिल पोलिस कर्मचारी व बाहेरुन सुमारे 30 पोलिस येथे बंदोबस्तासाठी तैणात करण्यात आले होते. याचबरोबर दंगा नियंत्रण पथकाची सहा वाहने या ठिकाणी तैणात करण्यात आले होते.