एक मराठा, लाख मराठाने सातारा दुमदुमला
सातारा : सातारा शहरात शुक्रवारी सांयकाळी चार वाजण्याच्या सुमारास रणरागिनींचं भगव वादळच अवतरलं. पोवईनाका परिसर, राजपथ आणि कर्मचारी पथ, पोलीस मुख्यालय मार्ग तर अक्षरश: भगवामय झाला होता. दोन हजाराहून अधिक युवती आणि महिलांचा सहभाग, एक मराठा, लाख मराठा, जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवाजी या घोषणांनी सातारा शहर दुमदुमत होते. मराठा क्रांती मूक मोर्चाच्या तयारीचा एक भाग म्हणून काढलेल्या या बाईक रॅलीमुळे जणू काही सातार्यात भगव वादळच आलं होतं.
सातारा येथे सोमवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची तयारी अगदी जय्यत सुरु असून प्रत्येक मराठा बांधव यासाठी कामाला लागला आहे. महिला, युवतीही यामध्ये मागे नाहीत. मोर्चाची जनजागृती करण्याचा एक भाग म्हणून महिलांनी शुक्रवारी बाईक रॅली काढली. रॅलीसाठी हजार महिला जमतील, असे नियोजन करण्यात आले होते. मात्र, जवळपास दोन हजारांहून अधिक महिला यामध्ये सहभागी झाल्यामुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकूल, पोवई नाका, राजपथ, राजवाडा आणि कर्मवीर पथ परिसर भगवाच झाला होता. सातारा शहर त्याचबरोबर आजूबाजूच्या उपनगरातील आणि लगतच्या गावांतील युवती, महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
महिलांच्या बाईक रॅलीची सुरुवात मराठा क्रांती मूक मोर्चाफ कार्यालयापासून होणार होती. मात्र, गर्दी लक्षात घेता याची सुरुवात जिल्हा क्रीडा संकुलातून करण्यात आली. यावेळी सर्वच महिला पारंपरिक वेशात आल्या होत्या. विशेष म्हणजे काही युवती तर चक्क बुलेटवर सवार होत्या. यामुळे ही रॅली आणखी लक्षवेधी ठरली. प्रत्येक महिलांसाठी फेटे होते. फेटा बांधण्यासाठी दहा ते बाराजण येथे उपस्थित होते. जिल्हा क्रीडा संकूलात समन्वय समितीच्या पदाधिकार्यांनी काही सूचना केल्यानंतर एक मराठा… लाख मराठाचा गजर झाला आणि बाईक रॅलीला सुरुवात झाली. अतिशय शिस्तबध्दरित्या ही रॅली पुढे जात होती. यावेळी संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून सोडण्यात आला होता.
जिल्हा क्रीडा संकूल, पोवई नाकामार्गे ही रॅली राजपथावरून राजवाडा परिसरात आली. यावेळी सातारकरही रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून शुभेच्छा देत होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. बाईक रॅली पोलीस मुख्यालयमार्गे पोवई नाक्यावरुन पुन्हा जिल्हा क्रीडा संकूलात आली. यानंतर पुन्हा एकदा सहभागी युवती आणि महिलांनी क्रीडा संकूलात एक फेरी मारली आणि बाईक रॅलीची सांगता झाली. येथे वेदांतिकाराजे यांनी मार्गदर्शन केले आणि कोणत्याही परिस्थितीत मराठा क्रांती मूक मोर्चा आंदोलनात महिलांचा सहभाग वाढलाच पाहिजे, यासाठी प्रत्येक युवती आणि महिलांनी सक्रिय व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.