सातारा : नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पाटणच्या दोन आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली वांग मराठवाडी धरणाचे प्रश्न महिंद धरणाची गळती या प्रश्नावरून आ. नरेंद्र पाटील यांनी पाटणचे आमदार करतात काय असा हल्लाबोल केल्याने आमदारशंभूराज देसाई संतप्त झाले या प्रश्नावरून पालकमंत्र्यांना लक्ष्य करण्यात आले नियोजन समितीच्या बैठकीकडे एसटी आगाराच्या विभाग नियंत्रकांनी पाठ फिरवल्याने संतप्त पालकमंत्री विजय शिवतारे यांनी नोटीसा बजावण्याचे आदेश प्रशासनाला दिले
निजोजन समितीची सभा आज पालकमंत्री विजय शिवतारेंच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर, कृषी व पणन राज्यमंत्री तथा सह पालकमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, नियोजन अधिकारी श्री. जगदाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरवातीला नुतन नियोजन सदस्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर विषय पत्रिकेवरील मागील सभेत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली का, या विषयी चर्चा झाली. त्यानंतर महिंद धरणाचे पुनर्वसन गेल्या तीन वर्षात पूर्ण झालेले नाही, हा मुद्दा आमदार नरेंद्र पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला. तसेच यावर जलसंपदामंत्री म्हणून तुम्हीच उत्तर द्यावे, असे सांगितले. पण पालकमंत्र्यांनी पाटबंधारे अधिकारी विजय घोगरे यांना उत्तर देण्यास नेमकी परिस्थिती सांगण्यास सांगितले. त्यावर घोगरेंच्या उत्तराला आमदार पाटील यांनी आक्षेप घेत सभागृहाला चुकीची माहिती देत असल्याचे सांगितले. तर घोगरेंची बाजू उचलून धरतानाच भाजपचे नेते ऍड. भारत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसोबत तिसर्या गटाची बैठक झाली होती. यात वांग मराठवाडी व महिंद प्रकल्पाबाबत निर्णय झाल्याचे सांगितले. नरेंद्र पाटील यांचे या उत्तराने समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी पालकमंत्र्यांना विचारणा केला. यात आमदार शंभूराज देसाई यांनी हस्तक्षेप करत श्री. पाटील यांना अडविण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, तुम्ही मधे मधे कशाला बोलताय, असा प्रश्न श्री. पाटील यांनी शंभूराज देसाईंना केला. त्यानंतर या दोघांत वाद सुरू झाला. तीन वर्षे प्रश्न सुटत नाहीत तर पाटणचे आमदार करतात काय, असा टोमणा श्री. पाटील यांनी मारताच शंभूराज देसाई प्रचंड भडकले. मी काय करतोय हे विचारण्याचा तुम्हाला अधिकार नाही. मी 18 हजार मतांनी निवडुन आलेला आहे. तुमच्यासारख्या पाचशे मतांनी निवडून आलेलो नाही. जे पाचशे मतांनी निवडुन आले त्यांना कधी असे विचारायचे धाडस झाले का, असा प्रश्न आ. शंभूराज देसाईंनी केला. त्यामुळे वाद आणखीच वाढला.
रामराजे नाईक निंबाळकर जलसंपदा तथा पालकमंत्री असल्यापासून हा प्रश्न मी मांडतो, असे श्री. पाटील यांनी सांगताच शिवतारे म्हणाले, इतके वर्षे न सुटलेला प्रश्न आता सुटावा म्हणून तुम्ही भांडताय कशासाठी ? महिंद हा लहान प्रकल्प आहे. त्याबाबत येत्या 31 तारखेला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे. त्यामध्ये बघू. यावर श्री. पाटील म्हणाले, महिंद धरणातील पाणी संपल्यावर बैठका घेऊन उपयोग नाही. पाणी संपल्यावर परिसरातील जनतेने कुठे जायचे असा प्रश्न केला. आम्ही विरोधी पक्षात आहे म्हणून आमचे ऐकुणच घ्यायचे नाही का, असा प्रश्न त्यांनी केला. यावर पालकमंत्री शिवतारेंनी या सभागृहात कधीही पक्ष म्हणून कोणतीही निर्णय घेत नाही. सर्वजण सर्वांच्या विचाराने निर्णय घेतात. यावर आनंदराव पाटील यांनी मध्यस्ती करत दोन्ही आमदारांनी सभागृहाची आचारसंहिता पाळावी, अशी भुमिका मांडली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी या प्रश्नावर 31 तारखेला बैठक आहे, तेथे तुम्ही या, तेथे निर्णय घेतला जाईल, असे सांगत हा वाद शांत केला.
नियोजन समितीच्या आजच्या सभेत सातार्याचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, माणचे आमदार जयकुमार गोरे, सदस्य डॉ. दिलीप येळगांवकर यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे सभेत फारसा कोणत्या विषयावर वाद ही झाला नाही आणि खुमासदार चर्चाही रंगली नाही.