सातारा : गेल्या 17 वर्षापासून सातारा जिल्ह्याच्या राजकारणात एकहाथी सत्तेचा दबदबा राखणार्या राष्ट्रवादीला यंदाच्या नगरपालिका व नगरपचायती निवडणूकींमध्ये जोरदार खिंडार पडले. 8 नगरपालिका व 6 नगरपंचायती राजकिय रणधुमाळीत राष्ट्रवादीने 10 स्थानिक स्वराज्य संस्था खिशात घातल्या तरी लौकिकाला साजेशी कामगिरी न झाल्याने बालेकिल्ल्यातच पत गमविण्याची वेळ राष्ट्रवादीवर पहिल्यांदाच आली. लोणंद नगरपंचायतीच्या चंचु प्रवेशानंतर भाजपने जिल्ह्यात तब्बल 14 जागा व दोन नगराध्यपदे खिशात घालत सातारा जिल्ह्यात पहिल्यांदा कमळ फुलवले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदार बाळासाहेब पाटील जोरदार धक्का देत तब्बल 16 जागांवर ताबा मिळवत काँग्रेस जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच रिर्चाज केली. तब्बल 63 जागांवर काँग्रेसने अस्तित्च घट्ट करत राष्ट्रवादीला चांगलाच दणका दिला.
उदयनराजेंनी वाजवली शिट्टी
जिल्ह्याच्या राजकारणाचा निकाल बराचसा धक्कादायक लागल्याने भाजप व काँग्रेसने राष्ट्रवादीला खर्या अर्थाने आत्मपरिक्षण करायला भाग पाडले. सातार्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची एकतर्फी सत्ता आली, तर भाजपने सातारा शहराच्या राजकारणात सहा जागांवर मुसंडी मारत जोरदार प्रवेश केला. नगरविकास आघाडीला 12 जागांवर समाधान मानावे लागले. 22 जागांवर शिट्टी वाजली. सर्व सामान्य विरुध्द राजघराणे या अटीतटीच्या लढाईत सातार्यातील सर्व साधारण मतदारांनी वेदांतिकाराजे भोसले या राजघराण्यातील उमेदवाराना नाकारत माधवी कदम या सर्वसामान्य चेहर्याला पंसती दिली.
पृथ्वीराज चव्हाणांना कौल; अन् भाजपचा चकवा
कर्हाड मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच काँग्रेसने राष्ट्रवादीला दणका देत 16 जागा खिशात घालत आमदार बाळासाहेब पाटलांच्या सत्तेला सुरुंग लावला. पृथ्वीराज चव्हाणांनी यंदा प्रथमच कराड शहराच्या विकासाच्या मुद्यावर मतदारांना भावनिक साद घातली. आणि हा प्रयोग यशस्वी ठरला. राष्ट्रवादीला अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने ही कर्हाडात जबरदस्त खेळी केली. प्रदेश सरचिटणीस अतुल भोसले, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, एकनाथ बागडी यांनी कुठे आघाडी तर कुठे स्वबळावर किल्ला लढवत चार जागा खिशात घातल्या व नगराध्यक्षपदी रोहिणी शिंदे यांना निवडून आणून चकित करायला लावणारा निकाल दृष्टीपथात आणला. सातार्यात ही मध्यभागात व पुर्व भागात प्रस्थापितांना घरी बसायला लावले. सहा जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले.
मनोमिलनाला अखेर यश
रहिमतपूर मध्ये अपेक्षेप्रमाणे जिल्हाध्यक्ष सुनिल माने व चित्रलेखा माने-कदम यांच्या मनोमिलनानुसार काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्याने 17 पैकी 13 जागा राष्ट्रवादीने खिशात घातल्या तर 4 जागा काँग्रेसकडे राहिल्या. फलटणमध्ये रामराजेच्यां विरोधात रणजितसिंहराजे निंबाळकर यांनी बंड पुकारले होते, मात्र फलटणकरांनी राजे गटाला साथ देत रामराजेनां सत्तेचा कौल दिला. राजेगटाने 17 तर काँग्रेसने 8 जागा पटकावल्या.
गड राखला पण प्रतिष्ठा गेली; भाजपचा नगराध्यक्ष 1 मतांनी विजयी
वाईत मकरंद आबाच्या तीर्थक्षेत्र आघाडीने 14 जागा मिळवल्या, मात्र हा आनंद त्यांना उपभोगता आला नाही. भाजपचा नगराध्यक्ष प्रतिभा शिंदे एका मताने निवडून आल्या त्यामुळे वाईकरांनी राजकारणातील मोठा उलटफेर अनुभवला. काँग्रेसने 6 जागा पटकावत राष्ट्रवादीची कोंडी केली. महाबळेश्वर पालिकेत कुमार शिंदे गटाच्या 11 जागा निवडून आल्या तर बावळेकरगटाला 6 जागांवर समाधान मानावे लागले.
म्हसवडमध्ये शेखर गोरेंना दिलावा
म्हसवड मध्ये शेखर गोरे गटाने 10 जागा मिळवत विधानपरिषदेच्या पराभवचे दुख कमी केले तर दहिवडीत 11 जागांवर कब्जा करत आमदार जयकुमार गोरे यांनी एक हाती सत्ता राखली. राष्ट्रवादीला 5 जागा मिळवता आल्या. मेढ्यात भाजप-सेना युतीने चमत्कार घडवत 13 पैकी 6 जागा खेचून आणल्या. 3 जागांवर अपक्ष निवडून आल्याने राष्ट्रवादीची जावली तालुक्यात चांगलीच कोंडी झाली.
पाटणमध्ये भाजपचा चंचू प्रवेश
पाटण तालुक्यात पाटणकरगटांने 13 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले पण तिथेही सेना – भाजप, तीन जागावर निवडून आल्याने विरोधी गटाचा पर्याय निर्माण झाला. पाचगणीत लक्ष्मी कर्हाडकरांनी 11 जागांद्वारे सत्तेवर वर्चस्व राखले, मात्र 6 जागांवर अपक्ष निवडून आल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे.

