कोरेगाव : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोरेगाव नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत सुमारे 82 टक्के मतदान झाले. सकाळपासून वाढलेला मतदानाचा वेग दुपारी कमी झाला, सायंकाळी मात्र तो पूर्ववत झाल्याने मतदानाची टक्केवारी वाढली आहे. 17253 मतदारांपैकी 14090 मतदारांनी मतदान केले.
प्रभाग क्र. 9 मध्ये दोन मतदारांना मतपत्रिकेवर मतदान करावे लागले, प्रशासनाने त्यास प्रगत मत असे नमूद केले आहे. या दोन मतदारांच्या नावावर अगोदर कोणीतरी मतदान केल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. सोमवार दि. 28 रोजी सकाळी 10 वाजता सरस्वती विद्यालयात मतमोजणी होणार आहे.
कोरेगावात नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर पहिलीच निवडणूक होत असल्याने उत्कंठा शिगेला पोहोचली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेसह मनसेने या निवडणुकीत उमेदवार उभे केल्याने रंगत आली होती. निवडणुकीपूर्वी दोनच दिवस अगोदर मारामारीसह दमदाटीचे प्रकार घडल्याने पोलिसांनी विशेष दक्षता घेतली होती. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हिम्मत खराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी शहराच्या प्रत्येक विभागात पोलीस बंदोबस्तात तैनात केला होता.
सकाळी 7.30 वाजता मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. सकाळपासून मतदानाचे मोठा वेग घेतला होता. दुपारच्या सुमारास मतदानाचा वेग काही अंशी कमी झाला होता, दुपारी 4 नंतर वेग वाढत गेला.
प्रभाग क्र. 9 मध्ये चौथाईतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रात दोन मतदारांना मतपत्रिकेवर मतदान करावे लागले. त्यांच्या नावावर दिवसभरात अन्य मतदारांनी मतदान केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन मतदारांनी त्यांची ओळख दाखविणारे पुरावे मतदान केंद्राध्यक्षांना सादर केल्यानंतर त्याची खातरजमा करण्यात येऊन, त्यांना मतदान करु देण्यात आले.
यासंदर्भात पत्रकारांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी या घटनेस दुजोरा दिला. ते म्हणाले, मतदाराचा नैतिक व मूलभूत अधिकार हा मतदान करण्याचा आहे, तो डावलता येत नाही.
याबाबत खातरजमा करण्यात आलेली आहे. शहरातील काही मतदान केंद्रांच्या बाहेर किरकोळ शाब्दिक चकमकी झडल्या, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवाळला.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, उपनिरीक्षक अशोक पाटील, बळीराम सांगळे, प्रज्ञा देशमुख व राजेंद्र यादव यांच्यासह राज्य राखीव दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. गृहरक्षक दलाने देखील बंदोबस्तामध्ये हातभार लावला.
प्रभागनिहाय एकूण मतदान, झालेले मतदान व त्याची टक्केवारी कंसात पुढीलप्रमाणे : प्रभाग क्र. 1 -771, 583 (75.62), प्रभाग क्र. 2 -1298, 997 (73.73), प्रभाग क्र. 3 -1121, 939 (83.76), प्रभाग क्र. 4 -793, 672 (84.74), प्रभाग क्र. 5 -1530, 1260 (82.03), प्रभाग क्र. 6 -768, 654 (83.98), प्रभाग क्र. 7 -1268, 1062 (83.75), प्रभाग क्र. 8 -1159, 963 (83.09), प्रभाग क्र. 9 -1587, 1302 (82.01), प्रभाग क्र. 10 -872, 736(84.40), प्रभाग क्र. 11 -1138, 892 (78.38), प्रभाग क्र. 12 -1117, 859 (76.90), प्रभाग क्र. 13 -625, 543 (84.19), प्रभाग क्र. 14 – 938, 784 (83.58), प्रभाग क्र. 15 -969, 813 (83.90), प्रभाग क्र. 16 -660, 552 (83.64), प्रभाग क्र. 17 -619, 528 (85.30).