Friday, April 25, 2025
Homeठळक घडामोडीरात्री- अपरात्री मिठ्या मारुन नागरिकांचे प्रश्‍न सुटणार आहेत का? ; आ....

रात्री- अपरात्री मिठ्या मारुन नागरिकांचे प्रश्‍न सुटणार आहेत का? ; आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा सवाल

आत्तापर्यंत काय काम केलं ते डिटेलमध्ये सांगा?
सातारा : चार- सहा महिन्यातून एकदा उगवायचं. रात्री- अपरात्री लोकांची दारे ठोठवायची अन कोणाला तरी उठवून मिठ्या मारायच्या, त्यांच्या पप्प्या घ्यायच्या आणि आपण जनतेचे कैवारी असल्याचा दिखावा करायचा. मिठ्या मारुन अन पप्प्या घेवून जर लोकांच्या घरात पाणी येत असते तर मीही ते केले असते. केवळ मिठ्या मारुन प्रश्‍न सुटत नाहीत. नळाला पाणी येण्यासाठी, लोकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रत्यक्ष काम करावं लागतं. केवळ दिखावा आणि पेपरबाजी करण्यापेक्षा तुम्ही आतापर्यंत काय काम केलं ते एकदा डिटेलमध्ये सांगा. जनतेलाही कळू द्या. रात्री- अपरात्री लोकांना मिठ्या मारुन नागरिकांचे प्रश्‍न सुटणार आहेत का? असा सवाल नगरविकास आघाडीचे नेते आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.
दरम्यान, केवळ निवडणूक आल्यानंतर तुमच्या घराभोवती घिरट्या मारुन, तुमच्यापुढे येवून भपकेगिरी आणि बोलबच्चन करुन विकासाचा देखावा निर्माण करायचा. तुम्हाला काय पाहिजे हे तुम्हीच ठरवा. आम्हाला फक्त काम करायचं आहे. पुढील पाच वर्षात सातारा शहराचा विकास कोण साध्य करेल, हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे आपल्या शहराचा विकास पाहिजे का पोकळ गप्पा याचा निर्णय नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
नगरविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले आणि नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ होलार मंदीर मंगळवार पेठ आणि अरुण टेलर, पुणेकर घराजवळ आयोजित कोपरा सभेत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विरोधकांचे वास्तव जनतेपुढे अधोरेखित केले. पुणेकर घराशेजारी झालेल्या कोपरा सभेस सौ. वेदांतिकाराजे, माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले, हेमंत कासार, माजी नगराध्यक्ष आणि प्रभाग क्र. 14 चे उमेदवार अशोक मोने, श्रीमती आरती पवार प्रभाग क्र. 13 चे उमेदवार सौ. सारिका जाधव, जनार्दन जगदाळे तर, होलार मंदीर येथे झालेल्या कोपरा सभेस सौ. वेदांतिकाराजे यांच्यासह उमेदवार महेश राजेमहाडीक, सौ. लिना गोरे, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. कांचन साळुंखे, हारुणशेठ कुरेशी, सौ. रुपाली शेलार, पांडूरंग शेलार, पिंटू गोळे, दादा आवटे, दशरथ करवले, अक्षय पिंपळे, बापू आवटे, बंडू करवले, अक्षय पिंपळे, पिंटू पावसकर, दिगंबर सांडगे, दिपक शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, शाळा, कॉलेज, कर्तव्य सोशल ग्रुप, विविध उपक्रमांच्यामाध्यमातून सौ. वेदांतिकाराजे यांचे कार्य अविरतपणे सुरु आहे. त्यांच्या कामकाजात मी कधीही हस्तक्षेप करत नाही. त्यांचे निर्णय त्या स्वत: घेतात. नगराध्यक्षपद हे पाच वर्षासाठी असून नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडूण दिला जाणार आहे. या पदासाठी खुल्या गटातील महिला आरक्षण पडल्याने या पदावर कार्यक्षम आणि लोकहितासाठी स्वत:चे निर्णय स्वत: घेणारी महिला विराजमान होणे आवश्यक आहे. नगराध्यक्षपदासाठी जेवढे उमेदवार रिंगणात आहेत, त्यातील कोण सक्षम आहे, हे विरोधकांसह नागरिकांनाही माहित आहे. आपले शहर लहान असल्याने शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट झाले नाही पण, केंद्र शासनाच्या अमृत योजनेत आपल्या शहराचा समावेश झाला आहे. या योजनेतून शहराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध होवू शकतो. मात्र, त्यासाठी सक्षम आणि खमक्या नगराध्यक्ष पाहिजे. त्यासाठीच सर्वांच्या विचाराने सौ. वेदांतिकाराजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागरिकांसाठी प्रशासन गतीमान करणारा, सुस्त प्रशासनाला हलवणारा आणि जनतेच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी त्वरीत निर्णय घेणारा निर्णक्षम नगराध्यक्ष हवा असेल तर, वेदांतिकाराजेंशिवाय पर्याय नाही. आम्हाला शहराचा विकास साध्य करायचा आहे. राजघराणे, आमदारकी, अजिंक्यउद्योग समुह यावर बोलून लोकांची दिशाभूल करायची. राजघराण्यातील उमेदवार नको, असे म्हणून सातार्‍याच्या विकासाला खिळ घालायची. शहराचे नुकसान टाळायचे असेल तर, विरोधकांचा हा डाव उधळूण लावण्यासाठी नविआला नागरिकांची साथ हवी आहे.
आमचा दृष्टीकोन नेहमीच सकारात्म राहिला आहे. उगाच मोठमोठी वाक्ये आणि शब्द वापरुन जनतेला भुरळ घालायची आणि जनतेबद्दल खोटा कळवळा आणायचा. यातून शहराचा विकास साध्य होणार असता तर, आम्ही पण असेच केले असते. आम्हाला चांगले काम करायचे आहे. केवळ डायलॉगबाजी करुन हे होणार नाही. कोणाचे पोटही भरणार नाही आणि शहराचा कायापालटही होणार नाही. सातारकर नागरिक सुज्ञ आहेत. तुम्ही कितीही तोंड चालवले तरी, आपले हित कशात आहे, याची जाण असल्याने नागरिक नविआलाच सेवा करण्याची संधी देतील, असा विश्‍वास आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी व्यक्त केला.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular