सातारा : नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवणूक-2016 जाहीर प्रचाराचा कालावधी मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत राहील. रात्री 10 नंतर जाहीर प्रचारासाठीचे ध्वनीक्षेपके वापरता येणार नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिली.
नगरपरिषद, नगरपंचायत निवणुकांमध्ये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगीक नगरे अधिनियम, 1965 चे कलम 23 मध्ये जाहीर प्रचाराच्या अनुषंगाने तरतूद असून त्यानुसार निवडणुकीच्या दिवशी जाहीर सभा घेण्यास मनाई आहे. या निवडणुकांमध्ये मतदानाच्या आदल्यादिवशी म्हणजेच 26 नोव्हेंबर 2016 च्या रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर प्रचार कालावधी राहील. रात्री 10 वाजल्यानंतर जाहीर प्रचारासाठी ध्वनीक्षेपक वापरता येणार नाहीत. मतदानाच्या दिवशी म्हणजेच 27 नोव्हेंबर 2016 रोजी दैनिक अथवा वृत्तपत्रात तसेच प्रसार माध्यमांद्वारे कोणत्याही प्रचार विषयक जाहिराती देता येणार नाहीत. याची नोंद सर्व उमेदवार व राजकीय पक्षांनी घ्यावी. जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यावर इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाद्वारे देखील प्रचारावर बंदी राहील. यामध्ये एसएमएस, सोशल मीडिया उदा. व्हॉटस्अप, फेसबूक, ट्विटर यांचाही समावेश आहे. निवडणुकीच्या कालावधीत इलेक्ट्रॉनिक मीडियाचा गैरवापर केल्यास, इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे आक्षेपार्ह संदेश प्रसिद्ध केल्यास सायबर गुन्ह्यांचा (बंदी, प्रतिबंध इ.) कायदा 2015 अंतर्गत असलेल्या तरतुदीनुसार तसेच, संबंधीत इतर लागू असलेल्या कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. सर्व उमेदवार, आघाड्या व राजकीय पक्षांनी आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यांनी केले आहे.