सातारा : जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतीसाठी राज्य निवडणूक आयोगाची आणि विधान पषिदेसाठी भारत निवडणूक आयोगाची आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. या आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करा, असे आदेश जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी आज दिले.
जिल्ह्यातील नगर परिषदा, नगरपंचायती आणि नगरपरिषदांकरिता थेट अध्यक्ष पदाची निवडणूक तसेच विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यासाठी आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणीबाबत आज जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक येथील नियोजन भवनात घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील निवडणुकांसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने पारदर्शी आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी काटेकोरपणे दक्ष रहावे. पोलीस यंत्रणांच्या माध्यमातून संवेदनशिल मतदान केंद्र निवडून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करा. या निवडणुकांसाठी भरारी पथक, तपासणी पथके, तक्रार निवारण कक्ष आदींच्या माध्यमातून आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर संशयास्पद बँक खात्यांची माहिती सर्व बँकेच्या व्यवस्थापकांनी द्यावी, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
तडीपारीसह प्रतिबंधात्मक प्रभावी कारवाई करा-जिल्हाधिकारी
जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये कोणताही अनुचीत प्रकार होणार नाही यासाठी आत्तापासूनच दक्षता घ्या. संवेदनशिल ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करा. समाजविघातक कारवाई रोखण्यासाठी तडीपारी, मोका, एमपीडीए अन्वये कठोर कारवाई करा, असे आदेशही जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यांनी यावेळी दिले. रात्री 10 नंतर ढाबे, हॉटेल्स बंद राहतील त्याचबरोबर विविध गैर मार्गाचा अवलंब करुन होणारी अवैद्य वाहतूक रोखण्याचे आदेशही उत्पादन शुल्क विभागाला दिले. विक्रीकर विभाग, आयकर विभाग आणि जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाच्या माध्यमातून उमेदवारांच्या खर्चावर नजर ठेवण्यात येणार आहे. या विभागाचे सूक्ष्म निरीक्षक पथक त्यासाठी काम करेल. निवडणूक निर्णय अधिकार्यांनी आपल्यास्तरावरही याबाबत बैठक घेवून सर्व यंत्रणांना आदेश द्यावेत, असे सांगून भयमुक्त वातावरणात आणि पारदर्शी निवडणुका होण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. मुद्गल म्हणाले.
तक्रारींची गांभिर्यतेने दखल घ्या- संदीप पाटील
निवडणुकांसाठी स्ट्राँग रुम निवडीबाबत प्रत्येक ठाणेदारांनी व्यक्तीश: भेट देवून पहाणी करावी. या काळात बर्याच तक्रारी येत असतात. या तक्रारी प्रत्येकाने गांभिर्याने घ्यावी. त्या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकार्यांशी तात्काळ संपर्क करावा. सर्व विभागांनी समन्वय ठेवून निवडणूक कालावधीत कठोर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीसाठी प्रांताधिकारी किशोर पवार, दादासाहेब कांबळे, स्वाती देशमुख, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, आरती भोसले, उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहलता श्रीकर, नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी किरणराज यादव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे, पोलीस उपअधीक्षक खंडेराव धरणे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर आदींसह विविध अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करा
RELATED ARTICLES