सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी सातारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी राजेशाही विरुद्ध सामान्य महिला असा सामना रंगला यामध्ये सामान्य कुटुंबातील सौ. माधवी कदम यांनी बाजी मारली. हा ताजा इतिहास असतानाही सातारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत एक राजेशाही चार लोकशाही असा राष्ट्रवादीचा फॉर्म्युला मांडण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सर्वसामान्यांच्या नावाने मते मागायची व प्रस्थापितांना पदे द्यायची, ही राष्ट्रवादी परंपरा यावेळीही कायम राखली जाईल. असे मानण्यात येऊ लागले आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्हा परिषदेच्या 64 जागांपैकी 39 जागी राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर वाजला आहे. पंचायत समितीच्या 128 पैकी 76 जागी राष्ट्रवादीने घवघवीत यश मिळवून कर्हाड वगळता सर्वत्र बहुमत मिळवले आहे. काल राष्ट्रवादी भवनमध्ये राष्ट्रवादीतून निवडून आलेल्या सदस्यांचा पक्षाचे नेते आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या अनुषंगाने सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद व विषय समितीचे सभापतीपद कोणत्या तालुक्याला मिळणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
राष्ट्रवादीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यावेळी काहीजण गैरहजर होते. त्यांना पक्षाने उमेदवारी देऊ न निवडून आणले आहे. तर काहींनी पक्षाच्या ध्येयधोरणानुसार मुलाखती देऊन विजयी खेचून आणला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याची भूमिका मांडली. ही भूमिका खंबाटकीचा घाट चढून वर आलीच नाही. सध्या अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुल झाल्यामुळे सामान्य कुटुंबातील वसंतराव मानकुमरे, सुरेंद्र गुदगे, मानसिंगराव जगदाळे, रमेश पाटील, यांचे नावे चर्चेत आहेत. त्याचबरोबर फलटणच्या राजघराण्यातील सातव्यांदा निवडून आलेले श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे या पदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे एक राजेशाही चार लोकशाही असाच फार्म्युला राष्ट्रवादीचा राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी छाती ठोकपणे सांगू लागले आहेत.
राष्ट्रवादीतून निवडून आलेल्या सर्व सदस्यांची नोंदणीकृत पॅनेज म्हणून नोंदणी केली जाणार आहे. राष्ट्रवादीच्याच सदस्यांना निधी देऊन मागील चूक दुरुसत केली जाणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये इर्षा वाढल्यामुळे एकसंगतेचा विजय झाला आहे. यापुढे नवीन कार्यकर्ता घेऊन पक्षाची जोरदार बांधणी करणार आहे. शिरवळ गटातून निवडून आलेले अपक्ष उदय कबुले यांनी राष्ट्रवादीसोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. कुडाळ गटात ऋषिभाई शिंदे यांचा पराभव होईल याची कल्पना होती. तसेच मला फार वेळ देता आला नाही अन्यथा तेथील चित्र बदलले असते, असेही आ. शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब भिलारे, महिला जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, सौरभ शिंदे, आशुतोष चव्हाण, प्रदेश संघटक बाळासाहेब महामुलकर, प्रदेश सरचिटणीस गोरखनाथ नलवडे, जिल्हा सरचिटणीस पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.