सातारा : जिल्ह्यातील प्रमुख आगार असलेल्या सातारा बसस्थानकात उघडयावर सोडलेले सांडपाणी आणि घाण यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे. गेल्या महिन्याभरापासून तक्रार करूनही याची दाखल एसटी महामंडळ घेत नसल्याने शहरातील दैनंदिन प्रवास करणार्या काही नागरिकांनी सातारा नगर परिषदेत आणि प्रदुषण महामंडळाकडे तोंडी तक्रार करत आक्रमक पवित्रा घेतला. पालिकेचे आरोग्य सभापती वसंत लेवे यांनी याप्रकरणी तात्काळ कारवाईच्या सूचना अधिकार्यांना केल्या. सातारा पालिका आणि प्रदुषण महामंडळाने संयुक्त कारवाई करत वाहणार्या सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून एसटी आगार प्रमुख आणि कॅन्टीन चालकावर कारवाई केली.
सातारा बसस्थानकात रोज लाखो प्रवासी येत-जात असतात. उघडयावर सांडपाणी आणि घाण कॅन्टीन चालकाकडून टाकले जात असल्याने गेल्या महिनाभरापासून आगारात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रवाश्यांना नाक-तोंड बंद करून आगारातून चालावे लागत आहे. अनेकदा सांगूनही कोणी लक्ष देत नसल्याने एसटी प्रशासनाच्या बाबतीत प्रचंड असंतोष प्रवाश्यांनी व्यक्त करत पालिकेचे आरोग्य सभापती वसंत लेवे यांना याची कल्पना दिली. तदनंतर प्रदुषण महामंडळाच्या बी. एम. खुकडे यांच्याकडे तक्रार केली. प्रदुषण महामंडळाच्या अर्चना जगदाळे आणि उमेश शिंदे यांनी कारवाई करत सांडपाण्याचे नमुने ताब्यात घेतले. उघडयावर वाहणार्या सांडपाण्यामुळे आगारात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. प्रवासी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता पालिकेकडून अनेकदा एसटी प्रशासनाला नोटीस देण्यात आली असून कारवाईचे संकेत आरोग्य निरीक्षक डी. जे. रणदिवे यांनी दिले. आगारात चाललेल्या कामामुळे शोषखड्यात पाणी साचले असून एसटी महामंडळाच्या दुर्लक्षामुळे हे पाणी वाहत असल्याचे कॅन्टीन चालकांनी सांगितले. यावेळी आक्रमक झालेल्या नागरिकांना पुढील दोन दिवसात तातडीने हे काम करून उघडयावर पाणी वाहणार नाही, असे नौशाद तांबोळी यांनी आश्वासन दिले.
लोकांच्या आरोग्याचा प्रश्न महत्वाचा असून या प्रकरणी अनेकदा सांगूनही एसटी महामंडळाकडून कारवाई होत नसेल तर पालिका कोणालाही पाठीशी घालणार नाही. सांडपाणी आणि घाणीमुळे आगारात प्रचंड दुर्गंधी पसरली असून कर्मचार्यांना स्वच्छतेच्या सूचना दिलेल्या आहेत.
-वसंत लेवे, आरोग्य सभापती, सातारा नगर परिषद.